भीमा कोरेगाव दंगलीचे पुरावे , वढू बुद्रूकात..... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ सप्टेंबर २०२०

भीमा कोरेगाव दंगलीचे पुरावे , वढू बुद्रूकात.....भीमा कोरेगाव दंगल घडली. त्या कटाचे पुरावे वढू बुद्रूकात. हे उघड सत्य. तपास मात्र ' आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी ' असा आहे. वढू गाव भीमा कोरेगाव पासून दोन किलोमीटरवर . तिथे छत्रपती संभाजीराजे यांची समाधी . समाधीचे पक्के बांधकाम केले. तेव्हा वीर गोविंद यांच्या शौर्याची माहिती देणारे फलक लागले. स्मारकावरील इतिहासाचे ४५ वर्ष जुने फलक तोडले. तिथे दंगलीच्या कटाची पहिली ठिंणगी पडली. फलक काढण्यामागे जातीय मानसिकता. खऱ्या अर्थाने पेशवाई प्रवृत्ती. तिला ठेचण्याचे काम गोविंद उर्फ गोपाळ गायकवाड यांनी सतराव्या शतकात केले.

दोन कट उधळले

वीर गोविंद यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पन्हाळगडावर कैद करण्याचा कट उधळला. कारस्थानी तीन मंत्र्यांना पकडले. पन्हाळ गडावरील कैदेत डांबले . या कामी हंबीरराव मोहिते यांची साथ मिळाली. त्यामुळे संभाजीराजेंचा १६ जानेवारी १६८१ ला राज्यभिषेक होऊ शकला. संभाजीराजे यांना विष पाजण्याचा कट रचला गेला. या कटाची माहिती औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबरने दिली. ती गुप्त माहिती गोविंद यांना मिळाली. लगेच त्यांनी हा कटही उधळून लावला. एवढेच नाहीतर कटवाल्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची जबाबदारी गोविंद आणि कवी कलश यांच्यावर सोपविण्यात आली. ती त्यांनी चोखपणे पार पाडली. त्याचा सूड पेशवाईची पिल्लावळ एकविसाव्या शतकात उगवत आहे. वीर गोविंद यांचा इतिहास संपविण्याची खेळी केली जाते.

संगमेश्वर ते तुळापूर

छत्रपती संभााजीराजे यांना रत्नागिरीजवळील संगमेश्वरला पकडले. बहादूरगडला हलविले. तेथून तुळापुरात नेले. औरंगजेबाने तिथे संभाजीराजे व कवी कलस यांची हत्या केली. या घटनेने मावळे चिडले. याचा बदला घेण्याचा निर्धार केला. संताजी घोरपडे, गोविंद गायकवाड, चव्हाण यांच्या सैन्य तुकड्या तुळापुरात पोहचल्या. फितूर झालेल्या. औरंगजेबाला मदत करणाऱ्यांचा बदला घेतला. अनेकांना कापून काढले. फितूरांची घरे जाळली. यात गोविंद गायकवाड यांची तुकडी आघाडीवर होती . कारण या भागाची माहिती गोविंद यांना होती. हा रागही होता. या द्वेषापायी खोटा इतिहास पसरविला. लोकांना चिथावले. त्यातून फलक तोडले. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार झाली. फलक पुन्हा लावा. निवेदनं देण्यात आली. प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर गोविंद गायकवाड यांचे वंशज राजेंद्र गायकवाड यांनी एक फलक लावला. हा फलक एका जमावाने तोडला. त्याच जमावाने वीर गोविंद गायकवाड यांच्या समाधीच्या छताची मोडतोड केली. या घटनेच्या तक्रारीवरून ३८ जणांच्या विरूध्द अट्रासिटीतंर्गंत गुन्हा नोंदविला. पोलिस अधिक्षक सुवेज हक यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी केली. त्यानंतर कारवाई केली. तातडीने सात जणांना अटक केली. ही कारवाई २९ डिसेंबर- २०१७ रोजी झाली. इतर मोकळे राहिले.३० डिसेंबर रोजी मिलिंद एकबोटेची पत्रपरिषद होते. तिथे बंदची घोषणा होते.३१ डिसेंबरला तलवार फेऱ्या निघतात.१ जानेवारी २०१८ ला वढू ,तणसवाडी, शिक्रापूर ,पेरणे, कोरेगाव आदी ठिकाणी हिंसक जत्थे रस्त्यावर येतात. शौर्य दिनासाठी येणाऱ्यांना अडवितात. तलवारीचा धाक, दगडफेक, काठ्यांनी हल्ला करतात. वाहनांना आगी लावल्या जातात. पोलिस बघ्याच्या भूमिकेत दिसतात. ५० च्यावर व्हिडिओ येतात. पोलिसांना दिले जातात. पटेल आयोगाला दिले जातात. हे पुरावे आल्यावर कारवाई व्हावयास हवी होती. ती झाली नाही की थांबविण्यात आली ? या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

वीर गोविंद गायकवाड..
गोविंद कोण ? हे जाणून घेण्यास थोडं इतिहासात जाऊ. रायगडचा किल्ला बांधण्यात आला. त्याचे वास्तू विशारद हिरोजी इंदूलकर . त्यांच्या मदतीला होते. हवालदार गणपत गायकवाड . ते  गडाच्या पायथ्याशी  राहत . ते गाव  पाचाड. गोंविद हे वडिलांसोबत गडावर जावू लागले. छत्रपती शिवाजींची पारखी नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी विचारपूस केली. सेनेत भरती करुन घेण्यास सांगितले. सैनिकी प्रशिक्षणानंतर  ते संभाजीराजे यांच्या पलटणीत आले. प्राणाची बाजी लावणारे, लढवय्ये, कसदार व पिळदार बांधा, युध्दकलेत तरबेज ,बुध्दीमान आणि प्रामाणिक . या जोरावर विश्वासू सरदार बनले. संभाजीराजेंना शृंगारपुरात पाठविले. तेव्हा सोबत गोविंद गायकवाड होते.
 पन्हाळगडावर सावली सारखे सोबत असत. 

रामसेज किल्ला...

रामसेज गडावर शत्रू आक्रमण होते. मदतीला गोविंद यांना पाठविले जाते. ते ६०० सैनिकांच्या जोरावर  १६८२ ते १६८७ पर्यंत एकाकी  किल्ला लढवतात. बाहेर औरंगजेबाची ४० हजाराची फौज असते. मोगलांची फौज  तीन हजार फुट उंचीचा प्रती लाकडी किल्ला बनविते. उंचीवरून तोफेचा मारा करते. तेव्हा किल्लेदार गोविंद यांची सेना लाकडी तोफांत रेती व बारूंद भरून मारा करते. धुर आणि रेतीने मोगल सेनेला डोळे चोळत बसावे लागते. पत्रावळींना केवळ अन्न लावून त्या खाली फेकत. जेणे करून किल्ल्यात लाखावर सेना आहे. धान्यसाठा भरपूर असल्याचे  भासवत. अनेक युक्त्या व कुलुप्त्या लढवून शत्रूला भयभीत करीत. ते किल्ल्यावर असेपर्यंत किल्ला जिंकता येत नाही.   दुसरीकडे औरंगजेबांनी किल्ला जिंकेपर्यंत मुकूट घालणार नाही असा प्रण केला. पांच  वर्ष रत्नजडीत  मुकूटाविना वावरावे लागले. गोंविंद यांची बदली होते. तेव्हा त्यांना चिलखती पोषाख, तलवार, सोन्याचा कडा देवून सन्मान केला जातो. 

चिपळुणचे किल्लेदार
 एका युध्दात गोविंद जखमी होतात. शत्रू त्यांना ताब्यात घेतो. त्याच्या सुटकेसाठी दोन लाख होनांची खंडणी देण्याची तयारी छत्रपती संभाजीराजे दाखवितात.   तहात गोविंद यांची सुटका होते. त्यांच्यावर रायगडावर दोन महिने उपचार चालते. ते ठणठणीत होतात. गोव्याच्या चढाईत सहभागी होतात. तेव्हा चिपळूण गोव्यात होते. चिपळूणचा कुभारगड किल्ला जिंकतात. त्याला स्टिफनचा किल्ला असेही संबोधले जात होते. या युध्दातील  सन्मान म्हणून गोविंद यांना या किल्ल्याचे किल्लेदार बनविले जाते. अशा अनेक पराक्रमाच्या नोंदी आहेत.

वढूचे महत्व....
औरंगजेबाची सेना  संभाजीराजे,कवी कलश यांना  तुळापूरला आणते. तिथे  त्यांची आैरंगजेबकडून हत्या केली जाते. हत्येनंतर त्यांच्या पार्थिवाचे तुकडे भीमा नदीच्या पात्रात टाकले . संभाजीराजेंच्या शोधात हेर बनून वीर गोविंद फिरत असतात. त्यांना घटनेची माहिती  मिळते. ते प्राणाची बाजी लावतात. औरंगजेबच्या सेनेचे तळ भेदतात. संभाजींच्या  पार्थिवाचे तुकडे एकत्र करतात. बढू बुद्रूूकात अग्नीसंस्कार करतात. तिथेच समाधी उभारतात. तेव्हापासून त्या स्थळाला व वीर गोविंद यांना अधिक महत्व आले. त्या ठिकाणी संभाजीराजे यांची पक्की समाधी आहे. परिसरातच गोविंद गायकवाड यांची समाधी आहे. या शौर्याबाबत सातारा गादीचे पहिले शाहू महाराज यांनी गोविंद गायकवाड यांना ४५ बिघा जमिन दिली. ती जमिन वढूत आहे. वारसदारांचा  तांबा आहे. हा त्यांच्या शौर्याचा सन्मान आहे. 

शिवाशीव नव्हती....
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यासाठी महार, मांग, मराठा, धनगर रामोशी अशा अठरापगड जातींतील तरुणांना गोळा केले. त्यांची सैन्य भरती केली. मावळे ही त्यांची ओळख. जाती होत्या. मात्र जातींवरून भेदभाव नव्हता. शिवाशीव नव्हती. त्यामुळे अनेक महार किल्लेदार व त्यापेक्षा वरच्या  पदावर होते. त्यापैकी एक गोविंद गायकवाड होत. संभाजीराजे, कवी कलश, गोविंद गायकवाड यांना वेगवेगळे करता येत नाही. स्वराज्याची हीच शक्ती. हाच खरा बहुजन इतिहास होय. पेशव्यांनी त्यात फाटाफुट केली. त्याची किंमत मोजावी लागली. पेशवे अतिशय मगरूर  झाले होते. पेशव्याची छत्रपती प्रतापसिंह भोसले  यांना  नजरकैद करण्यापर्यंत  मजल गेली होती. पेशव्याचे हस्तक चुकीचा इतिहास सांगतात.  यातून फोडाफोडीचे राजकारण करतात. संभाजीराजे, गोविंद गायकवाड, कवी कलश यांना मानणाऱ्यांसह  अठरापखड जातींची माणसं   एकत्र आणण्याचे काम व्हावे. ही खरी छत्रपती शिवाजी व संभाजीराजेंना आदरांजल्ली ठरेल. विजयस्तंभास मानवंदना देण्यास येणाऱ्या निशस्त्रांवर , महिला, लहान मुलांवर हल्ला माणूसकी  नव्हे. त्या हल्लेखोरांना खड्यासारखे शोधून कारवाई व्हावी. तेव्हाच रयतेचे राज्य वाटेल.

 बंद पाळणारे हल्लेखोर
 स्थानिक हिंसक जमावाने निशस्त्र लोकांवर हल्ले केले. दगडफेक केली. तीन मजली इमारतींवरून दगडफेक होत होती. हे दगड तिथे कसे गेले ? लाठ्याकाठ्यांनी हल्ले झाले. ही दंगल नाही. एकतर्फी हल्ले होते. हे उघड आहे. तसे गुन्हेंही नोंदविले. अजामीनपात्र गुन्ह्यात मनोहर भिडे  अटक होत नाही. हा रोष आंबेडकरी जनतेत आहे. इथं राजकारण करण्यात आल्याचं तत्कालिन सरकारवर आरोप आहे. हा सर्व प्रकार लोकांना माहित आहे.  २७ ते ३१ डिसेंबर २०१७ रोजी जे काही घडले.  ही सर्व माहिती  पोलिसांना होती. तरी खबरदारी का घेतली नाही. खुपिया विभाग काय करीत होता की खुपिया विभागाच्या अहवालाकडे कानाडोळा करण्यात आला. यांची गाज त्या भागातील पोलिसांवर पडणार हे निश्चित होते. ती कारवाई टाळण्यासाठी एल्गार परिषद, अर्बन नक्षलची खेळी खेळण्यात आली. या खेळीत हल्लेखोर   मोकाट आहेत . मात्र मार खाणाऱ्यांच्या समर्थकांवर उलट ठपका ठेवण्यात आला. ही पेशवाई होय की पोलिसशाही  ? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. पोलिसशाहीने उजव्यांच्या मदतीने आंबेडकरी चळवळीवर अर्बन नक्षलचा ठप्पा मारला. त्याला राज्यसत्तेने  साथ दिली. असा हा त्रिकुटी कारस्थान आहे. हिंसाचाराच्या आड अनेक आंबेडकरवाद्यांना डांबले. कोर्टकचेऱ्यांची भानगड लावली. त्या कृती विरोधात असंतोष वाढत आहे. हल्लेखोर कोण आहेत. हे उघड दिसत आहे. यासाठी प्रशिक्षित पोलिसांची गरज नाही. सामान्य माणूसही सहज सांगेल. त्या तपासाला वेगळा रंग देणे. हा सुध्दा सुडाचा भाग आहे.  पटेल आयोग नेमला. हा फेक आयोग असे लोक बोलू लागले. हल्ल्यात जखमी होणाऱ्यांना तुम्ही कसे जखमी झाले अशी साधी विचारपूस केली नाही. तर राष्ट्रीय तपास यंत्रणेचा तपास भरकटलेला आहे. अशा या तपासाला काय नाव द्यावे ?

-भूपेंद्र गणवीर
............BG.............