भीमा कोरेगाव युध्दाने 'छत्रपती'ची कैदेतून सुटका.. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ सप्टेंबर २०२०

भीमा कोरेगाव युध्दाने 'छत्रपती'ची कैदेतून सुटका..
भीमा कोरेगाव अस्पृश्यांचा विजय दिन. तसाच मराठ्यांचा मुक्ती दिन . या युध्दाने पेशवाई संपली. छत्रपती प्रतापसिंह भोसले नजरकैदेतून सुटले. अखेरच्या अाष्टी सोलापूर लढाईत ते इंग्रजांकडून लढले. यावरून भीमा कोरेगाव स्मारक बहुजनांसाठी तेवढेच महत्त्वाचे ठरले. भीमा नदीचे काठ. भीमा कोरेगाव युध्द तिथे झालं. इंग्रजांकडे केवळ ८३४ सैनिक होते. बॉम्बे नेटीव्ह इन्फन्ट्रीची महार रेजिमेंट शिरूरला होती. त्यात ५०० महार सैनिक. ३०० घोडेस्वार , अन्य तोफवाले. पेशव्यांकडे २८ हजार सैनिक. त्यात घोडेस्वार अधिक. भीमानदी ओलांडताना सामना झाला. पेशव्यांची सेना आक्रमनाच्या हेतूने आलेली. समोरा गेले महार सैनिक . प्राणपणाने तुटून पडले. पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांची दाणादाण केली. पेशव्यांची महार सैनिकांशी अशी पहिल्यादा गाठ पडली . ती प्रत्यक्ष युध्दभूमीत. तेव्हा पेशव्यांना नाही ते सर्व आठवले. तलवारी, भाले उपसताच दिवसाढवळ्या डोळ्यांसमोर तारे चमकले. प्रत्यक्ष युध्दाला सुरुवात झाली. पिळदार, दणकट बांधा असलेल्या मनगटातील तलवारी चमकल्या. त्यांच्या हवेतील गतीने शत्रू भेदरले. त्याचा हवा तसा परिणाम झाला. एक-एक सैनिक हजारांवर भारी पडू लागला. युध्दाचे चित्रच बदलले. अगोदर महार सैनिक पेशव्यांकडून लढत असत. त्यामुळे त्यांच्या ताकदीचा नेमका अंदाज नव्हता. ते अक्षरश: चित्ता झेप घेत वार करू लागले. समोर येईल त्याला कापत सुटले. ब्रिटीश सेना अधिकारी अवाक होते. हे दृश्य बघून ते सुध्दा जोषात आले. बघता-बघता पेशवे पळ काढू लागले. त्यांच्यावर घोडेस्वार सोडले. घोडेस्वार पळणाऱ्या एकाएका पेशव्याला टिपू लागले. पाठोपाठ तोफेचा मारा सुरु केला. पाठलाग सुरु झाला. छावणीत घुसले. शस्त्रसाठा सोडून पळाले.

विजयस्तंभ स्मारक
या युध्दात महार रेजिमेंटचे ५० सैनिक शहिद झाले. त्यात २२ महार, ११ युरोपियन ,काही मुस्लिम व मराठा होते. पूना हार्सचे ४७ ,मद्रास तोफखान्याचे १२ सैनिक होते. ब्रिटीशाच्या दृष्टीने हा विजय गौरवाचा होता. त्यामुळे त्यांनी शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला. त्या स्तंभावर शहीद सैनिकांची नाव कोरली. या लढाईने व विजय स्तंभाने पेशवाईचा काळा इतिहास कळला. अस्पृश्यांच्या छळासोबत मराठ्यांच्या छळाच्या घटना उजेडात आल्या. इतिहासकारांनी युध्दाची नोंद घेतली. सोबत पडदाही टाकला. विजय स्तंभामुळे इतिहास झाकता आला नाही. त्यावरचा पडदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उचलला. महार सैनिक अस्पृश्यांच्या समतेसाठी लढले. पेशव्यांना त्यांच्या विषमतेच्या वागणूकीची अद्दल घडविली. पेशवाई संपली. सोबत जुलमी राजवट गेली. हे युध्द सुमारे १२ तास चालले. पेशव्यांनी पळ काढला होता. ते म्हैसूरकडे पळाल्याचे समजले.

राजधानीचा ताबा
सैनिकांनी आपला मोर्चा साताऱ्याकडे वळविला. सातारा ही पेशव्यांची राजधानी. सैनिकांनी तिचा ताबा घेतला. पेशव्यांच्या छावण्या, त्यांची शस्त्रं, दारूगोळा ताब्यात घेतला. राजवाड्याची झडती घेतली. अनेकांना बंदी बनविले. नजरकैदेत असलेल्या छत्रपती प्रतापसिंह भोसले यांची सुटका केली. ते छत्रपती अखेरच्या आष्टी युध्दात इंग्रजांकडून लढले. या युध्दाचे नेतृत्व कँप्टन फ्रांन्सिस स्टॉटन करीत होते. या विजया बद्दल त्यांना पदोन्नती देण्यात आली. याशिवाय तलवार व ५०० सोन्याचे शिक्के देवून सत्कार करण्यात आला.

छत्रपतींना नजरकैद..
छत्रपती शिवाजीराजे यांच्या राज्यभिषेकाला भटांनी केलेला विरोध सर्वश्रूत आहे. संभाजीराजे यांच्या विरोधातील कटकारस्थानंही बहुतेकांना माहित आहेत. मावळ्यांनी त्याचा सूड तुळापुरात उगवला. वाडेही जाळले. त्यामुळे तुळापुरात पेशवे उरले नाहीत. पेशव्यांनी छत्रपतींना सुध्दा छळले. त्याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. शनिवार वाड्यातून कारभाराची सूत्रे हलू लागली. तेव्हापासून पेशवाई मगरूर झाली. छत्रपती रामराजे यांचे १७७७ ला निधन झाले. त्यानंतर धाकटे शाहु यांचा ११ डिसेंबर १७७८ ला राज्यभिषेक झाला. त्या अगोदर १७७४ पासूनच पेशवे वरचड झाले होते. त्यांचा १७९४ पासून अतिरेक वाढला. राजकुमार प्रतापसिंह यांच्यावर पाळत होती. ते शिकू नयेत अशी खेळी होती. हे ओळखून माईसाहेब त्यांना लपून शिकवित.रात्री उठून दोन ते तीन वाजेपर्यंत धडे घेत. अल्पवयातच ते १८०८ ला सत्तेवर आले. छत्रपती झाले. तेव्हा पेशव्यांनी त्यांना साताऱ्याच्या किल्ल्यात नजरकैद केले. अनेक निर्बंध लावली. ही बाब मराठा सेनापती चतुरसिंह भोसले यांना खटकली. त्यांचा राग अनावर झाली. त्यांंनी पेशव्या विरूध्द बंड केला. हा बंड पेशव्याचे सेनापती बापू गोखले यांनी मोडून काढला. त्यानंतर आणखी कडक निर्बंध लादले गेले. छत्रपती नजरकैदेत आहेत. हे खटकत होते. मात्र बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. पेशव्याचा सेनापती बापू गोखले भीमा कोरेगावच्या युध्दात मारल्या गेले. दुसरे सेनापती त्र्यंबक डेंगळे यांना कैद केले. या कारवाईने मराठ्यांचे वाईट दिवस संपले.

विकास कामांना गती
भीमा कोरेगावच्या युध्दात पेशव्यांचा पराभव झाला. छत्रपती प्रतापसिंह भोसले इंग्रजांना भेटले. माँट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन यांनी १० फेब्रुवारी १८१८ ला त्यांच्याकडे छत्रपतीपद सोपविले. त्यांच्या मदतीला गँड डफ प्रशासक सल्लागार नेमला. त्यांनी प्रतापसिंहराजे यांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले.त्याचा त्यांना फायदा झाला. त्या काळात त्यांनी साताऱ्यात व संस्थानात अनेक लोकहिताची कामे केली. विकास कामे झाली. त्यामुळे त्यांची परेपकारी, सज्जन, विकासशील , लोकप्रिय राजा अशी ओळख झाली. शाळा सुरु केल्या. डोंगरावर तलाव बांधला. तेथून पिण्याचे पाणी दिले. नवी बांधकामे केली. अनेक सुधारणा केल्या. ब्राह्मणेतर चळवळीला गती दिली. पेशव्यांनी अस्पृश्यावर वाईट रूढी, परंपरा लादल्या. जगणे मुश्किल केले. पेशव्याचे हे निर्दयी, अत्याचारी स्वरूप जगा समोर आले. मात्र राज्यकारभाराचा काळा इतिहास पुढे आला नाही. त्यांचा इतिहास नव्याने लिहिन्याची गरज आहे. प्रतापसिंह यांचे शिक्षण, बालपण ते छत्रपती असा प्रवास संघर्षाचा होता. हे विषय कथा, कांदबरी व चित्रपटाचे आहेत.
भीमा कोरेगाव युध्दाने अस्पृश्यांचे भले झाले. अनेक अधिकार मिळाले. त्यापेक्षा अधिक लाभ मराठ्यांच्या पदरात पडले. एकतर छत्रपतींची नजरकैदेतून सुटका झाली. सातारा संस्थानात शिक्षण, आरोग्य, पिण्याच्या पाण्याच्या सोयी व अन्य विकास कामे झाली. प्रतापसिंह हे १८३७ पर्यंत सत्तेवर होते. त्यानंतर लहान बंधू सत्तेत आले.

बहुजन कल्याण
भीमा कोरेगाव युध्द बहुजनांसाठी कल्याणकारी ठरले. पेशवाई प्रभाव क्षेत्रात ब्राह्मणेत्तर चळवळीने जोर धरला. त्याचे श्रेय कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना जाते. ही चळवळ कोल्हापूर, सोलापूर , सातारा ,सांगली भागात फोफावली. त्याची फळं मिळाली. सत्तेत भागिदारी वाढली. राजकारण, सहकार, शिक्षण, अर्थकारणात ब्राह्मणेतरांची सरशी झाली. ते चित्र आजही कायम आहे. फडणवीस सरकारने ती साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. आयाराम, गयारामचे राजकारण केले. कच्चे मासे गळाला लागले. ही खेळी फसली. हा भाग वेगळा. त्या सरकारने सामाजिक प्रश्न सांमजस्याने सोडविण्या एेवजी चिगळविले. त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागतील. भीमा कोरेगाव दंगल चौकशी तपास साधा विषय. नाहक त्याला वेगळा रंग दिला. एका अर्थाने बरं झालं. विखूरलेल्या संघटना, विचारांची माणसं एकत्र येण्याची प्रक्रिया आरंभ झाली. भीमा कोरेगाव दंगल ही त्यांची देण होय. हे विसरता येणार नाही. ती पेशवाई मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या माध्यमातून पुन्हा डोकेवर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. तिला वेळीच ठेचण्याची गरज आहे. उध्दव सरकारने तातडीने एसआयटी नेमावी. भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी करावी. बहुजनांनी भीमा कोरेगावचे महत्व ओळखावे. सामाजिक ताणाबाणा नव्याने विणावा. भिडे, एकबोटे प्रवृत्तींना खड्या सारखे बाजूला सारावे.यातच बहुजनांचे कल्याण आहे.

-भूपेंद्र गणवीर
...........BG............