मुंढे यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती - महापौर संदीप जोशी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

मुंढे यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती - महापौर संदीप जोशी
नागपूर, ता. २६ : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, त्यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती. त्यांच्यासोबत मतभेद झाले मात्र ते कामाच्या बाबतीत होते. वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.

महापौर संदीप जोशी म्हणाले, जनप्रतिनिधी याच शहरात लहानाचे मोठे झाले आहे. या शहराचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे. नागरिकांच्या समस्या माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्तांनी प्रत्येक जनप्रतिनिधींशी समन्वय ठेवायलाच हवा. आम्हाला घेऊन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. आयुक्त तुकाराम मुंढे हे आमचे वैयक्तिक शत्रू नव्हते. त्यामुळे त्यांची बदली झाली असली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद नाही. लोकांना घेऊन चालले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. ही बदली शासनाने केली आहे. आता शासन आमचं नाही. सन २०१९ पूर्वीची पाच वर्षे वगळता शासन काँग्रेसचं होतं. त्याही काळात अनेक आयुक्त आलेत. परंतु प्रत्येकासोबत आमचे मित्रत्वाचे संबंध होते. यापुढे जे आयुक्त येतील त्यांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, आम्ही ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहू, असेही ते म्हणाले.