ई-पास तसेच शेती व शैक्षणिक परवाने वगळता इतर सर्व प्रवासी ऑफलाईन परवाने रद्द - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१७ ऑगस्ट २०२०

ई-पास तसेच शेती व शैक्षणिक परवाने वगळता इतर सर्व प्रवासी ऑफलाईन परवाने रद्द
गडचिरोली,(जिमाका)दि.17
गडचिरोली जिल्हयातील अधिनस्त विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, वित्तीय संस्था, निमशासकीय संस्था,इतर संस्था, कंत्राटदार, नागरिकांचा समृह,नागरिक यांना सुचित करण्यात येते की, या कार्यालयाद्वारे तेंदु पत्ता निविदाधारक व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांना ये-जा करण्यासाठी, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी, जलसिंचन/जलसंधारण प्रकल्पाचे कामासाठी, मान्सुनपूर्व कामे पार पाडण्यासाठी मोबाईल नेटवर्क चे संबंधाने तांत्रिक विघाडाची दुरुस्ती करण्यासाठी, राईस मिलर्स (सीएमआर) यांना तांदुळ ने-आण करण्याच्या कामासाठी, फायबर केबल उभारणासाठी, दुसऱ्या जिल्हयातील कार्यालयप्रमुख म्हणून समकक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्यास जाणे-येणे करण्यासाठी, बाहेरील राज्यातुन /जिल्हयातून मजूर आणण्यासाठी , प्रकल्पाच्या कामासंबंधाने मशिनरीज ने-आण करण्यासाठी गोण खनिजांची विक्री करण्यासाठी , उपसा सिंचन योजनेचे कंत्राटदार यांना ये-जा करण्यासाठी, रुई गाठी साठवणूक करण्यारीता मजूर आणण्यासाठी, कापूस खरेदीसाठी, दुरसंचार विभागाचे साहित्य आणण्यासाठी , कारागृह बंद्यांना मुळ गावी जाण्यासाठी, उर्जा प्रकल्प अभारणीची कामे करण्यासाठी तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पुरवठाधारकांना जिल्हयात ये-जा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे वेळोवेळी ऑफलाईन परवाने देण्यात आले होते. सदरचे परवाने आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी परिपत्रकान्वये ताबडतोड अंमलासह रद्द केले आहेत.
फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे निर्गमित करण्यात येत असलेले ई-पास त्याचप्रमाणे तहसिलदार यांनी शेतीकामासाठी व शैक्षणिक कामासाठी निर्गमित केलेले परवाने नियमितपणे चालु राहतील अशा सूचना आज जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकान्वये निर्गमित केले आहेत.