नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे खासदार अशोक नेते यांचे निर्देश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ ऑगस्ट २०२०

नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे खासदार अशोक नेते यांचे निर्देश

सावली व ब्रम्हपुरी तालुक्यातील पुरपीडित भागाची केली पाहणी

गडचिरोली, ता. ३१ : चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 31 आगस्टला सावली,  ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली.  गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीसह इतर उपनद्यांच्या पुरामुळे सावली व ब्रम्हपुरी तालुक्यात 52 किलोमीटर पर्यन्तच्या गावांमध्ये पुराचे पाणी गेलेले असून घराचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सावली तालुक्यातील  निमगाव, कसरगाव, डोंगरगाव, विहिरगाव, चिखली, निफन्द्रा, बोरमाळा व अंतरगाव यासह अन्य गावे पाण्याखाली असून गावांचा संपर्क तुटलेला आहे . येथील शेती पूर्णतः पाण्याखाली बुडालेली आहे तसेच शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र व अन्य कार्यालये पाण्याने वेढलेली आहेत.
         गंभीर पूर परिस्थिती पाहता खासदार अशोक नेते यांनी लागलीच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने व सावलीचे तहसीलदार पाटील यांना भ्रमणध्वनी वर संपर्क करून पुराची परिस्थिती पाहता युद्धपातळीवर काम करून परीसरातील सर्व शेतीचे व इतर नुकसानीचे सर्व्हेक्षण करून तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच 1994 नंतरचा सर्वात मोठा पूर आलेला असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळीच दखल घेऊन नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी केल्या.
      तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली असून गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे व अनेक गावामधील शेती पाण्याखाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा करून गोसेखुर्द धरणाचे दरवाजे बंद करण्यात यावे व दरवाजे उघडायाचे झाल्यास कमी प्रमाणात उघडण्याचे निर्देश दिले असता मुख्य अभियंता यांनी पूर्ण 33 दरवाजे आज दि 31 आगस्ट रोजी दुपार पासून बंद करण्यात आले असल्याचे सांगितले.
   खासदार अशोक नेते यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्या दरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, सावलीचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तहसीलदार पाटील, पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.