डॉक्टरांसह औषध विक्रेत्यांनाही लगाम! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑगस्ट २०२०

डॉक्टरांसह औषध विक्रेत्यांनाही लगाम!

कांतीलाल कडू यांच्या मागणीनंतर लेखा परिक्षण समितीच्या प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी डॉ. दीपा भोसले यांनी दिले अन्न व औषध प्रशासनाला पत्र

पनवेल/प्रतिनिधी
शहरातील औषध विक्रेते आणि खासगी डॉक्टरांकडून रूग्णांची होणारी चिरफाड लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीने लेखा परिक्षण समितीच्या प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी डॉ. दीपा भोसले यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारानंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासन, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि आयुक्तांनाही पत्र धाडून होणार्‍या लुटमारीला लगाम लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांसह चढ्या भावाने औषध विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
कोविड साथीचा गैरफायदा घेत काही खासगी हॉस्पीटल प्रशासनाने अक्षरशः ओरबाडून खाण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्यासोबतीला त्यांचे काही औषध विक्रेतेही लूटमारीत सामिल झाले आहेत. दोघांनीही दरोडे घालण्यास सुरूवात केल्याने कोविड रूग्णांची मोठी पंचाईत झाली आहे.
यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी शासकीय लेखा परिक्षण समितीच्या प्रमुख असलेल्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीपा भोसले यांच्याशी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. त्यानुसार त्यांनी पेण येथील अन्न व औषध प्रशासनाला पत्र लिहून चढ्या भावाने पीपीई कीट व रेमडीसीवर, टॅब्युलिझमचे इंजेक्शन आणि इतर औषधे विकली जात असल्याचे कळवून त्यांच्यावर तातडीने छापे मारून कारवाईचे निर्देश दिले आहेत.
त्याशिवाय महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख यांना पत्र पाठवून खासगी हॉस्पीटलमधून कोविड रूग्णांची होत असलेली लूट लक्षात आणून देत त्यांनाही कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील नखाते, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे ठाणे विभागीय अधिकारी डॉ. वैभव गायकवाड यांनाही कारवाईसाठी कळविण्यात आले आहे, अशी लेखी माहिती डॉ. दीपा भोसले यांनी कडू यांना देताना त्या पत्रांच्या प्रतीही पाठविल्या आहेत.
भोसले यांच्या धडाकेबाज पावलानंतर आता महापालिका, अन्न व औषध प्रशासन, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे अधिकारी कारवाईचे कोणते हत्यार उगारतात, ते लवकरच कळेल.