डेंग्यू बाबत संपूर्ण माहिती ठेवा .. उपचारापेक्षा प्रतिबंध करून परिवाराची काळजी घ्या .. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ ऑगस्ट २०२०

डेंग्यू बाबत संपूर्ण माहिती ठेवा .. उपचारापेक्षा प्रतिबंध करून परिवाराची काळजी घ्या ..चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आवाहन.....

चंद्रपूर २५ ऑगस्ट - आपल्या परीसरात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डेंग्यु डासाची उत्पत्ती टाळणे आवश्यक आहे याकरीता आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणुन पाळण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. डेंग्यू रोगास कारणीभूत असणारी एडीस ही मादी डास ही जमिनीपासून १०० मीटर पर्यंत उडू शकते त्यामुळे आपण आपल्या घराचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. डेंग्यू रोगाचा डास हा स्वच्छ पाणी व काही दिवस साठवलेल्या पाण्यात फोफावणारा असल्याने आठवड्यातून एकदा तरी पाण्याची भांडी रिकामी करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवावीत तसेच पाणी भरलेली भांडी घट्ट झाकून ठेवावीत. घर व परीसरातील पाणी साठ्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतल्यास आपण व आपल्या कुटुंबियांना याचा निश्चितच फायदा होईल.
डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे , अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु सर्वसामान्यांना या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे याबाबत नागरिकांना वारंवार माहिती देऊन व स्वच्छता विभागाद्वारे युद्धपातळीवर कार्य करून जनजागृती करण्यात येत आहे.
डेंग्यू विषाणूजन्य व नोटीफायेबल असल्याने म्हणजेच कुठल्याही खाजगी व शासकीय डॉक्टर्सना असा संशयित रुग्ण आढळल्यास त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची माहिती महानगरपालिकेस कळविणे अनिवार्य आहे.
महानगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागाद्वारे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. शहरात धुरीकरण व औषध फवारणी सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी प्राधान्याने शाळांमध्ये आणि रुग्णालयात जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यू व मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी जनजागृतीपर पत्रकांचे वाटपही शहरात करण्यात आलेले आहे. एमपीडब्लू, एनएम व आशा वर्कर्स मार्फत तापाचे रुग्ण शोधणे, रक्त नमुने घेणे व औषधोपचाराचे कार्य सुरु आहे. डास अळी असलेले दूषित भांडी आढळल्यास आवश्यक तेथे अबेट, टेमिफॉस औषधी टाकण्यात येत आहे. घरोघरी जाऊन डास अळी आढळणारी भांडी रिकामी करण्यासंबंधी नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, जास्त दिवस पाणी साठू न देता डासांची उत्पत्ती टाळावी. शहर डेंग्युमुक्त करण्याच्या मनपाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

आपल्या परीसरात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुढील गोष्टी अवश्य करा.
१. डेंग्यूचा मच्छर हा स्वच्छ पाण्यात अंडी देणारा असतो त्यामुळे स्वच्छ पाणी साठवून ठेऊ नका.
२. घरी असलेल्या फ्रिजची टॅंक हमखास साफ करा.
३. एकदा भरलेले कुठलेही पाणी सात दिवसापर्यंत साठवून ठेवण्यात येऊ नये.
४. पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणे व पाणी अशुध्द होऊ नये याची काळजी घ्या.
५. परिसरात कचरा साठू देऊ नका.
६. डास अळी आढळणारी पाण्याची भांडी रिकामी करा.
७. सोसायटी मधे राहणाऱ्या रहिवाश्यांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
८. आठवड्यातून एक दिवस सर्व पाण्याची भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळून स्वतःचे व कुटूंबाचे आरोग्य रक्षण करा ,सतर्क राहुन स्वतःची काळजी घ्या.