विद्यार्थ्यांना मारहाणीचा निषेध, अब्दुल सत्तार मंत्रिपदाचा राजीनामा द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

विद्यार्थ्यांना मारहाणीचा निषेध, अब्दुल सत्तार मंत्रिपदाचा राजीनामा द्याभाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्याचा आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची संवेदनशीलतेने दखल घेण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पोलिसांकरवी मारहाण करणे हा मस्तवालपणा आहे, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका करावी तसेच या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सहानुभूतीने दखल घ्यावी, अशी मागणी मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
ते म्हणाले की, आपल्या रास्त मागण्या पालकमंत्र्यांना सादर करण्यास धुळे येथे अभाविपचे कार्यकर्ते गेले होते. दोन दिवस विनंती करूनही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना भेट नाकारली. त्यामुळे त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते. तथापि, त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली व त्यांच्यापैकी काहीजणांना ताब्यात घेतले.
लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण काही करत असल्याचा दिखावा महाविकास आघाडी सरकार करत असते. या आघाडीचे मंत्री त्या संदर्भात पंतप्रधानांकडे मागण्याही करतात. पण प्रत्यक्षात आज पोलिसांनी निवेदन देणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामुळे या सरकारचा मुखवटा फाटला आहे व मस्तवाल चेहरा दिसला आहे, असे त्यांनी सांगितले.