अण्णाभाऊ श्रमण संस्कृतितील योध्दा #aanna bhau sathe - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ ऑगस्ट २०२०

अण्णाभाऊ श्रमण संस्कृतितील योध्दा #aanna bhau sathe

अण्णाभाऊ साठे जयंती
निमित्त : एक चिंतन


अण्णाभाऊ साठे यांनी माणूसकीचा वारसा जपला. त्यांनी जे बघितले. जे अनुभवले. जे भोगले. ते लिहले. वास्तव जगापुढे मांडले. कष्टकऱ्यांचे दु:ख वेशीवर टांगले. त्यांच्या लिखाणात कल्पनाविलास नव्हता. त्यांच्या कथा, कांदबरी, लावणी, पोवाडे ,लोकनाट्य व शाहीरीत वास्तव आहे. त्यामुळे त्यांनी जे जे लिहले. ते सर्व गाजले.

त्यांनी मराठी साहित्याला नव्या वाटा मिळवून दिल्या. चाकोरीबध्द, मनोरंजनात बंदिस्त मराठी साहित्याला चळवळीत नेले. नवी दिशा दिली. समृध्द केले. गावकुसाबाहेर, पालेतील, परिघाबाहेर जगणाऱ्यांचे जीवन मांडले. एकिकडे पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष होता. कष्ट होते. तर दुसरीकडे लिखाण . अशा दुहेरी कसरतीत जगले. तरी सत्तरांवर पुस्तकें लिहली. त्यात अर्ध्याअधिक कांदबरी आहेत. अनेक पुस्तकांचा पंजाब, तामीळ,कन्नड या प्रादेशिक भाषेत तर काहींचा रशिया,फ्रेंच, जर्मनसह २७ विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला. तेव्हा ते साहित्यसम्राट ठरले. संत तुकाराम यांचे साहित्य बुडविण्यात आले. तर या तुकारामचे साहित्य दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. मराठी साहित्य म्हणजे कोणाची मक्तेदारी नाही. शाळेत न जाता दर्जेदार साहित्य निर्माण करता येते. हे अण्णाभाऊंनी जगाला दाखवून दिलं. यातून नवा इतिहास घडविला. अन् ते आधुनिक एकलव्य अन् तुकाराम ही ठरले. त्यांचा जन्म १ आँगस्ट १९२० रोजी झाला.तेव्हा वडिल भाऊराव साठे यांच्याकडे बालघुटी पाजण्यासही पैसे नव्हते.फकिरा लुटलेल्या इंग्रज खजिन्यातील पैसे देतो.त्या पैशाने बालघुटी पाजली जाते. वडिल भाऊराव साठे यांनी मुलाचे नाव तुकाराम ठेवले. ते त्यांनी सार्थ करून दाखविले. एवढ्या मोठ्या क्षमतेचा साहित्यिक महाराष्ट्राने दिला. काही जण नावात वडिलाचे नाव नको म्हणून अण्णा भाऊ साठे असे लिहतात. जग अण्णाभाऊ म्हणूनच ओळखते.त्यांचा जन्म दिन मराठी दिन म्हणून साजरा करा अशी मागणी करते.

आजादी झूटी है...

त्यांनी महाराष्ट्रावर गीत रचले. मुंबई आपल्या शब्दात सांगितली. त्यांचा वसा बंडाचा होता. त्यांनी उभे केलेले पात्र त्याचे साक्षीदार आहेत. लेखन, वाणी आणि कार्यकर्ता या त्रिवेणीच्या जोरावर ते मुंबईत स्थिरावले. आपल्या वाणीच्या जोरावर मुंबईकरांना भुरळ घातली. ये आजादी झुटी है ,या मोर्चाला स्वपक्षीय नेतृत्वाच्या विरोधानंतरही अलोट गर्दी उसळते. ही त्याची साक्ष आहे.
अण्णाभाऊ यांनी लाल बावटा कलापथक स्थापन केला. या कला पथकावर बंदी येते.त्यांच्या शाहीरीवर निर्बंध येतात. तेव्हा तमाशाला लोकनाट्यात बदलतात. उघड्यावरच्या तमाशाला सभागृहात स्थान मिळवून देतात. लोक जागृती करतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो की गोवामुक्ती आंदोलन असो. त्यांच्या डफाची थाप आणि शाहीरीने लोक पेटून उठतात. हि किमया केवळ अण्णाभाऊच करू शकतात. हे गोवा व महाराष्ट्रातील जनतेने जवळून बघितले.मुंबई महाराष्ट्रात दिसते.त्याचे मोठे श्रेय अण्णाभाऊंना जाते.

मानवतावादी साहित्यिक

त्यांनी साहित्यातून मांडलेले विचार, सिध्दांत मानवतावादी आहेत. परिवर्तनाचा व प्रबोधनाचा जागर आहे. ते जात, धर्म, प्रदेशात बंदिस्त होत नाही. त्यांचा संघर्ष मानवमुक्तीचा होता. त्यांना कँम्यूनिष्ठाच्या पंगतीत बसविणे हा सुध्दा अन्याय होईल. उत्तरार्धात ते आंबेडकरवादी झाले. त्यांची सर्वाधिक गाजलेली कांदबरी फकिरा त्यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. बाबासाहेबांबाबत ते म्हणतात..

जग बदल घालून घाव,
सांगून गेले मज भीमराव!

त्यांची शाहीरी वर्ग व जातीवादावर प्रहार करणारी आहे. त्यांचे साहित्य, समाजकारण, राजकारण व्यवस्था परिवर्तनासाठी होते. शोषणमुक्तीसाठी आहे. कष्टकरी व दलित समाजाच्या विकासासाठी आहे. ते एका समाजाचे नव्हते. सर्व समाजाचे होते. फकिरा ' या कांदबरीतून त्यांनी बारा-बलूतदारांचा लढवय्यपणा , त्याग, समर्पणे दाखविला. आपल्या समाजाच्या हितासाठी प्राण पणाला लावणारे समाजातील नायक उभे केले. तमासकार महिलेवर कांदबरी लिहितात. त्यातून शिक्षणाचा संदेश देतात. शिक्षणाचे महत्व पटवून देतात. क्रांतीकारी फकीरा इंग्रज राजवटी विरूध्द लढतो.फकिरा सोबत त्यांचा घोडाही कांदबरीचा भाग बनतो.जीव लावणारा घोडा साकरतो. मुक्या प्राण्यावरही जीवापाड प्रेम करणारा फकिरा व समाजही दिसतो. उपेक्षित मातंग समाजातील हिरो साकारला जातो. माकडवाला व माकडीन हे चित्रणही मार्मिक आहे. ही किमय्या अण्णाभाऊ यांच्यातच होती.

भाकरीचे नाते

त्यांची साहित्याची तलवार तळपणारी होती. त्यांनी उभा केलेला नायक, नायिका व्यवस्थेविरूध्द बंड करतात. रडत नाही. ते लढतात. चिखलातील कमळ या कांदबरीवर मुरली मल्हारीरायाची चित्रपट निघाला. वैयजंता, डोंगराची मैना, अशी साताऱ्याची तऱ्हा, वारणेचा वाघ हे चित्रपट त्यांच्या कांदबऱ्यांवर निघाले. ते व्यवस्थेवर प्रहार करणारे. देवाच्या नावावर सोडणाऱ्या मुरळी, देवदासी महिला साहित्यातून मांडल्या. क्रांतीवीर नाना पाटील उभा केला.यात शेतमाळातून फिरणाऱ्या क्रांतीविराला साथ देणारे समाजघटक. तमाशाचा फड, भाकरी चितारतात.भाकरी हा एक उल्लेख असंख्य घरांसोबत नातं जोडते. त्यातून प्रत्येकाला जोडण्याचे साहित्य कसब दिसते.

दीड दिवसाची शाळा

इथल्या जाती व्यवस्थेचे चटके त्यांनाही बसले. ते पहिल्या दिवसी शाळेत गेले. दुसऱ्या दिवशी पंतोजीने बेदम मारले. त्यानंतर ते शाळेतून पळाले. पुन्हा शाळेचा उंबरठा चढले नाहीत. केवळ दीड दिवस शिकले. शाळेत न जाता ते लोकशाहीर झाले. साहित्यिक झाले. त्यांच्या कांदबऱ्यांवर चित्रपट निघाली. त्यांचे पोवाडे व शाहीरीने नवे विक्रम केले. लोक जागृती केली. नवा इतिहास घडविला. ते १९३१ मध्ये मुंबईला गेले.तेव्हा पालकांसोबत २५० मैलाचा पायी प्रवास केला. कोराना काळातील प्रवासी मजूरांची घरवापसी. मार्गात भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्ठा आठवणी ताज्या करतात. गिरणीत कामावर जाता-येता दुकानांवरच्या पाट्या पाहू पाहू लिहणे, वाचणे शिकले. मुंबई त्यांची कर्मभूमी झाली. प्रारंभी मिळेल ते काम केले. सोबत क्रांतीची गाणे गाऊ लागले. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी स्टँलिनग्राड पोवाडा रचला. तो पोवाडा जग प्रसिध्द झाला. त्यांचे १७ भाषेत भाषांतर झाले. त्या पोवाड्याने  ते राशियन लोकांमध्ये राज कपूरच्या बरोबरीत लोकप्रिय झाले.
रशियाच्या राष्ट्रपतीचा त्यांना सन्मान लाभला. त्यांचे ताश्कंदसह अनेक शहरांत जंगी स्वागत झाले.

 माळावर नेले साहित्य 

अण्णाभाऊ यांनी घरात फिरणारे साहित्य  कष्टकऱ्यांच्या कट्यावर, भटक्यांच्या पालावर व  शेतकऱ्यांच्या माळावर नेले. त्यांचे साहित्य  बहूजन कल्याणाचे होते. त्यांच्या शाहीरीची नाळ  कृषी  संस्कृतीला जोडणारी होती. मनू व मुनी संस्कृती नाकारणारी होती. त्यांनी दैववादाला ठोकरले होते. शाहीरी व तमाशाची सुरवात गणाने होते. त्यांनी  गणपतीला नमन करणारे गण नाकारले. यातचं त्यांची वैचारिक दिशा कळते. त्यांचा क्रांतीकारी भाव कळतो. नवा गण  लिहला.  त्यात  भूमीला व महापुरूषांना वंदन करतात. प्रथम वंदन मायभूला करताना ते म्हणतात..

प्रथम मायभूच्या चरणा ,
छत्रपती शिवबाच्या चरणा,
स्मरून या गातो कवना !

दैववादाला ठोकरले
लावणी म्हणजे नखापासून केसांपर्यंत रमणारी श्रृगांरी लावणी. ती  बदलली. तिला वीर, शौर्य , व्यथा, दु:ख मांडणारी . न्यायाची चाड, अन्यायाची चीड व्यक्त करणारी बनविली.
पृथ्वी शेषाच्या माथ्यावर  नाही. तर कष्टकरी , शेतकरी, दलिताच्या तळहातावर आहे.असा वैचारिक सिध्दात मांडला. हा विचार दैववादाच्या सिध्दाताला ठोकरणारा आहे. वयाच्या २२ व्या वर्षी विदेशी सत्काराचा सन्मान मिळाला. दलित साहित्य संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष झाले. त्यांचे अध्यक्षीय भाषण कमालीचे गाजले. तेथून दलित साहित्याला नवी ओळख मिळाली.
ही वैचारिक परंपरा मोठी आहे.  

धनवंतांनी अखंड पिळले,
धर्मांधांनी ही खूप छेडले!

 या ओळी भांडवलदारी अर्थव्यवस्थेला विरोध करतात. तसेच धार्मिक रूढी, परंपरांवर प्रहार करणाऱ्या आहेत. त्यातून अण्णाभाऊ कळतात.

..............................
आरक्षण कोटा अन् वाटा
...............................

अण्णाभाऊ साठे व्यापक जनहिताचा विचार करणारे होते. त्यांनी डाँ.  बाबासाहेब  आंबेडकर  यांना आपले दैवत मानले. त्या बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले होते. ही वैचारिक परंपरा तथागत बुध्द, चार्वाक, महात्मा ज्योतिबा फुले, संत तुकाराम, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे अशी आहे. ती  श्रमण संस्कृती . जी सतत वैदिक संस्कृती विरूध्द लढणाऱ्या शूरांची आहे. या व्यवस्थेविरूध्द लढणाऱ्या शुरांच्या पंगतीत मोडणारे अण्णाभाऊ होते.  ते माणूसकीसाठी लढले. मानवमुक्ती लढ्यातील ते प्रखर योध्दे होते.  ते एका जाती पुरते मर्यादित नाहीत.

 अलिकडे  आरक्षण कोट्यात  वाट्याची  मागणी  केली जाते. ही चिथावणी  आहे. यामागे अगोदर फोडा. मग झोडा. अन् राज्य करा. ही वैदिक नीति आहे. यासाठी माणसं सोडली आहेत.  समरसतेच्या नावावर त्यांचा वावर असतो. आता वाट्यासाठी चिथावणी  देणाऱ्या  शत्रूंनी तो कोटाच संपविला. जे जे सरकारी होते. ते सर्व खासगी  केले जाते. त्यातून काही उरले ते  ठेक्यांवर दिले जाते.  कोटाच उरला नाही .मग वाट्याचे काय घेवून बसला. शत्रू  हुशार आहे. अगोदर कोट्यात वाट्याचे भांडण लावले. तरी जमेना. त्यासाठी सुलभ शौचालयाचा प्रयोग आणला. तो यशस्वी झाला. सफाई कामगार भरती बंद झाली. मग कपात आणली. अनेकांना घरी बसावे लागले.काहींनी मिळेल त्या वेतनात  सुलभ शौचालयात नोकरी धरली. दिल्लीचे बिंदेश्वर पाठक मालामाल झाले. त्यानी सर्व राज्यांत जम बसविला. महापालिका, नगर परिषदा, बस स्थानके, रेल्वे स्टेशन सर्वत्र सुलभचे बस्तान दिसते. तसे बघता सफाई वर्ग सर्वांत संघटित  होता. त्यांच्या  संघटना होत्या.  त्यांना काय झालं ,ते काही कळलंच नाही. आता सफाईची कामे ठेक्यात चालतात. काहीच्या नोकऱ्या बाकी आहेत. त्या संपल्या की वारसदारांच्या नोकरीचा मार्ग बंद होईल. नव्या नोकऱ्या नाहीत. या मोबदल्यात अयोध्येत पांच सफाई कामगारांचे  पंतप्रधान पाय धुतात. याला खूशी म्हणावे की गम. इतक्या बेमालूमपणे चालते. अशावेळी अण्णाभाऊ आठवतात.त्यांचे शब्द आठवतात यह आजादी झूठी है.
समान संधीत फसगत
भारतीय संविधान आले. त्यात समता व  समान संधीचे धोरण ठरले. कायदे झाले. त्यानुसार प्रत्येक राज्यातील त्या त्या लोकसंख्येनुसार शोषितांपैकी १३ टक्के एससी, ७ टक्के एसटी म्हणजे अनुसूचित जाती- जमाती २० टक्के. कुठे १५ व साडे सात टक्के लोक. ५२ टक्के ओबीसी मिळविले. तर ७२ टक्के होतात. त्यात अन्य मिळविले तर ८५ टक्के होतात.  या लोकांना उच्चवर्णिय १५ टक्के लोकांच्या बरोबरीने आणण्याचे  ठरले होते. त्यासाठी एसी,एटींना आरक्षण दिले. केंद्र सरकारने भरले केवळ तीन-चार टक्के. ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले. ते उशिरा लागू झाले. हे सर्व आरक्षण शतप्रतिॆशत भरले काय ? उत्तर नाही असेच आहे.  आरक्षण अनुशेषाचे अभ्यासक कृष्णा इंगळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, केंद्र सरकाने तर जाती-जमातीचे आरक्षण किती भरले याचे आकडेच नाहीत. केवळ तीन टक्केच भरले असावे.  अनुशेष भरण्याबाबत केंद्र सरकार कधी गांभीर्याने घेतच  नाही. त्यामुळे केंद्रात ही स्थिती राहिली. काही राज्य सरकारांची थोडी चांगली कामगिरी आहे. त्यात महाराष्ट्र आहे. मात्र पुर्ण कोटा  भरला गेला नाही. शोषित थोडे फार प्रशासनात येतात. काम करावयास लागतात. ते अतिउच्चवर्णियांना त्यांच्या बरोबरीने दिसू लागतात. ते सुध्दा दुसऱ्या तिसऱ्या श्रेणीत. तरी यावर पोटसुळ उठले. मग त्यावर नवी तोड काढली जाते.  कोट्यात वाटा मागण्याची चिथावणी  सुरू होते. आपसात कुरबुरी वाढतात. 
 
लबाड कोल्हा..........
 शाळेत शिकवलेली एक गोष्ट आठवते. कारण ती या क्षणाला शंभर टक्के लागू होते. ती गोष्ट खाऊ, माकड, मांजर आणि लबाड कोल्ह्याची आहे. माकड व मांजरात खाऊ वाटा भांडण चालते.  त्यांचे भांडण सोडविण्यास कोल्हा येतो. वाटणी सुरू होते.  वजनकाटा  कधी डावीकडे कधी उजवीकडे झुकतो. प्रत्येकवेळी खाली झुकणाऱ्या पारड्यातील खाऊ कोल्हा काढून घेतो. हे करीत करीत कोल्हा सर्व  खाऊ फस्त करतो. खाऊच संपल्याचे बघितल्यावर माकड व मांजराचे डोळे उघडतात. आपसातील भांडणाने घात झाल्याचे लक्षात येते. आरक्षण कोटा व वाट्याचे भांडण तसेच आहे. शंभर टक्के कोटा भरला गेला असता. तर शोषितांमध्ये शोधूनही बेकार सापडला नसता. या समाजांमध्ये ग्रामीण भागात स्थिती वाईट आहे. जे आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. तर वाट्याचे भांडण उदभवलेच नसते. मिळालेल्या तीन टक्के नोकऱ्यांही त्यांना पचत नाही. त्यासाठी सरकारी नोकऱ्याच संपविण्याचा कट आखला जातो.  सेवा अगोदरच  ठेकेदारीत टाकल्या. सफाई कामगारांच्या नोकऱ्या संपल्या. त्याने हिंमत वाढली. मग खासगीकरणाचा झपाटा लावला. रस्ते, शाळा, बससेवा, दवाखान्याचे खासगीकरण केले. आता रेल्वे, विमान, सरकारी उपक्रम, बँका, सरकारी इमारती ,रेल्वे स्टेशन सर्वच विक्रीस काढल्या गेले. लहानमोठे ठेके मालमत्ता सत्तेतील दलालांना. ते चूप. बाकी मोठ्या उद्योगपतींना. यात नोकऱ्यांचा कोटाच संपला. मग कोट्यात वेगळा वाटा कुठून मिळणार. निवडणुका आल्या की मेगा भरतीची घोषणा. नोकऱ्याच ठेवल्या नाहीत.

सरकारी नोकऱ्यात घट

 केंद्र सरकारच्या ४० लाख नोकऱ्या होत्या. त्या आता १० लाखांवर आल्या. सरकारी नोकऱ्या संपविण्याचाचं  डाव आहे. रस्ते बांधकामात माणसांंएेवजी मशीन आल्या. सर्वच इंन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात  अशीच स्थिती आहे. नोटबंदी,जीएसटी नंतर आँल इंडिया मँन्यूफँक्चर्स असो.ने सर्वेक्षण केले. त्यात व्यापारी क्षेत्रात ४३ टक्के, सुक्ष्म क्षेत्रात ३२ टक्के, लघू विभागात  ३५ टक्के, मध्यम क्षेत्रात २४ टक्के नाेकऱ्या कमी झाल्या. खासगी क्षेत्रात नोकऱ्या घटत असताना सरकारने खासगीकरणाचा झपाटा लावला. कोरोना काळात तो आणखी वाढवला. इकडे सरकारी नोकऱ्या संपविल्या जात आहेत. दुसरीकडे खासगी क्षेत्रातील नोकऱ्या घटल्या.या दुहेरी चक्राचा सर्वाधिक मार जाती,जमाती आणि त्या पाठोपाठ ओबीसींना बसत आहे.

नवे षडयंत्र....
सध्या झूटवर झूट सफेद झूट चालते. उच्चवर्णियािचे प्रशासनावर पुर्ण ताबा असताना सरकार  पुन्हा १५ टक्के उच्चवर्णियांसाठी पुढे आले. त्यांच्यासाठी  १० टक्के आरक्षण कोटा मंजूर केला. अचानक चार दिवसात. बिना चर्चेने विधेयक  मंजूर होते.  आयएएस नाही. तरी सरळ सचिव, सहसचिव केले जाते. ही सरळ भरती त्या १० टक्क्यासाठीच तर नाही ना अशी शंका येते. आहे ना गंमत.  हे एकिकडे दृष्टचक्र चालते. तेव्हाच दुसरीकडे ७० टक्के लोकांकडे जेवढी संपत्ती आहे. तेवढी संपत्ती १० कुबेरांकडे जमा होते. संपत्ती वाढीचा हा वायूवेग चक्रावणारा आहे. त्यांचाच पैसा निवडणुकीत ओतला जातो. हे लागेबांधे उघड दिसतात. कोरोना काळात देशात ८० कोटी लोक उपासी आहेत. त्यांना गोदामात सडणाऱ्या धान्याचे वाटप कले जाते. हे गरीबीचे आकडे सरकारी आहेत. ८५ टक्के लोकांना  वंचित ठेवून विश्वगुरूवर भाषण झोडतात. एवढा निर्लज्जपणा वाढला आहे. सत्तेचा दिखावा काही असला तरी ८५ टक्के जनता देशोधडीला लागली आहे. या स्थितीत नवा लढा, नवे लढवय्ये तयार करावे लागतील. हे एेक्याशिवाय अशक्य आहे. लोकशाही उच्चवर्णीय व भांडवलशाहीच्या खुंटाला बांधली जात आहे. हे उघड दिसत असताना मध्यमवर्गीय गप्प कसा ? असा प्रश्न पडतो.

बेकीचा फटका

संविधान निर्मात्याने लोकशाहीत  एक- एकटे लढले तर नाहक बळी जाल. त्यापेक्षा समुहाने राहा. समुहाने जगा. समुहाने लढा.असे ऎकीचे बळ दिले. अगोदरच्या सरकारांनी  सार्वजनिक उद्योग, उपक्रम उभारले. त्याने प्रशासनात  फुल ना फुलाची पाखळी या धोरणाने उपेक्षितांना नोकऱ्या दिल्या. रेल्वे सुरू केली. बँकांचे राष्ट्रीयकरण केले. यातून रोजगार, पैसा झोपडीपर्यंत पोहचण्यास सुरूवात झाली. विद्यमान सरकारने त्या सर्व सरकारी सेवांचे ठेकेदारीकरण चालू केले. विमा, रेल्वे. दूरसंचार,खाणी, विमान सेवा, जलसेवा खासगी लोकांना विकल्या जात आहेत. बँकांची मालकी विक्री सुरू केली. या विक्रीसोबत तुमचा कोटाही संपत आहे. आरक्षणाचे कायदे होते तसे कायम आहेत. मात्र आरक्षणाच्या जागा झपाट्याने संपविल्या जात आहेत. कोटाच नाही तर वाटा कुठला. ही स्थिती निर्माण केली  जात आहे. तरी जाती, जमाती, ओबीसीचे लोकप्रतिनिधी गप्प आहेत. संसदेत जातीजमातीचे १३० च्यावर आणि ओबीसीचे ११३ खासदार आहेत. त्यांच्यावर उच्चवर्णीय खासदार भारी  आहेत. देशात ८५ टक्क्यातील राजस्थानात  गुर्जर, मिणा, गुजरातमध्ये पटेल, महाराष्ट्रात  मराठा,  धनगर आदी आरक्षण मागत आहेत. हक्काचा कोटा मागत आहेत. त्यांना टाळले जाते. मोर्चे काढतात. पोलिस त्यांना लाठ्यांनी बदडतात.अनेक शहीद होतात. तरी मागण्या पदरात पडत नाहीत.बसपा नेते कांशीराम हे बोलत असताना त्यांच्या हातात नेहमी पेन दिसावयाची. ते पेनची टोक वेगळी करून म्हणत रिफील असलेला भाग ८५ टक्के  आणि वरचा टोक १५ टक्के आहे. वरचा टोक काढुन टाकला. तरी काही अडत नाही. मात्र आमचा भाईचाऱ्यावर विश्वास आहे. तो टिकला पाहिजे. त्यासाठी पेन-टोकर दोन्ही ठेवतो म्हणत पेनाचे टोकर बंद करीत. ती पेन कधी आडवी ,उभी करीत भाषण देत. त्यांचे हे ८५ - १५ टक्क्याचे समिकरण समजून वाटचालीतच बहूजन कल्याण आहे.

डफाचे भय कायम...

अण्णाभाऊ होते. तेव्हा त्यांच्या डफ  व शाहिरीचा सरकार धसका घेत होती. आजही सरकार डफाला घाबरते. तो मग जेएनयूमधला असेल.पुण्यातील  शितल साठे, सचिन माळीचा असेल किंवा एल्गार परिषदेचा असेल. एवढी प्रतिष्ठा अण्णाभाऊंनी डफाला मिळवून दिली. तसे डफ आरक्षण कोटा वाचवण्यासाठी एकत्रितपणे आणावे लागतील. शहराशहरात निनादावे लागतील. नाहीतर १९४७ च्या अगोदरच्या दिवसांना सामोरा जावे लागेल.सरकारी तंत्राने भीमा  कोरेगावचा लढा असाच दडपला गेला. अनेकांमागे भानगडी लावल्या .काही सज्जनांना अर्बन नक्षल ठरविले. तर सनातन्यांनी   गोविंद पानसरे,  नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश ,कुलबर्गी यांना गोळ्या घातल्या. मारेकऱ्यांवर पडदा राहावा. कटाचे सूत्रधार उघड होऊ नये. यासाठी केंद्रातून धावपळ करीत एनआयए तपास यंत्रणा पाठविली जाते. हा सर्व आरक्षण संपविण्याच्या कटाचाच भाग असावा. अगोदर संशय होता. आता खात्री वाटू लागली. यावर एकच उपाय आहे. एकत्र या. अगोदर आरक्षण कोटा वाचवा.तो वाचल्यावर वाटा मिळवा. यासाठी आपआपल्या लोकप्रतिनिधींना बोलते करा. लोकशाहीतील तो महत्वाचा घटक आहे. हक्कासाठी तो बोलता व्हावा. एवढीच अपेक्षा.
- भूपेंद्र गणवीर
...........BG...............