पर्यटनाला कोरोना दंश! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०२०

पर्यटनाला कोरोना दंश!पर्यटन म्हटलं की, डोळ्यांसमोर निळ्याशार समुद्राच्या लाटा ओसंडून वाहतात...तर कुठे हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत असलेल्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा...!यंदा मात्र हा योग कोरोनामुळे जुळून येऊ शकला नाही. निसर्ग भ्रमंती चांगलीच लांबणीवर पडली आणि पर्यटकांचा हिरमोड झालाय.विदर्भातील ताडोबा, मेळघाट, पेंच, नवेगावबांध, उमरेड-कऱ्हाडला, बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची होणारी मांदियाळी यंदा अनुभवायला मिळाली नाही. "शाळांना सुट्टी लागल्यावर आपण वाघ बघायला जंगलात जाऊ, मनसोक्त गप्पा करू, खूप भ्रमंती करू, मौजमजा करू.... या विश्वात लहानगे रमले होते. त्यांना पण घरीच राहून करमणूक करावी लागली. पालकांना धीर देऊन घरीच रहा...असं लहान मुलांना सांगावं लागलय. एक ना अनेक कल्पना डोक्यात साठवून व्याघ्र पर्यटन करण्याची इच्छा बाळगून असलेल्या पर्यटकांसाठी कोरोनाचा प्रवास धक्कादायक आहे. मार्च पासून सुरु झालेल्या कोरोनाने सर्वच क्षेत्राची मोठी हानी केली. त्यातच सर्वांचे आवडीचे असलेले व्याघ्र पर्यटन तर पूर्णपणे बंद झाले. मार्च, एप्रिल आणि मे मध्ये पर्यटकांची जंगलात रीघ लागते. चढाओढ सुरु होतेय की, नेमक्या कोणत्या व्याघ्र प्रकल्पात जाण्यास मिळेल. घरी 'प्लॅनिंग' होते. कधी जायचं, कुठून जायचं, कसे जायचे? यंदा पण नियोजन ठरले असेलच. मात्र, कोरोनाने स्वप्नाचा चेंदामेंदा केलाय. आता तर पावसाळा आणि त्यात कोरोना अशा दुहेरी संकटात पर्यटन व्यवसाय सापडला आहे.

कोटींचे नुकसान!

प्रवास करण्यास सवलत असली तरी कोरोनाची भीती संपलेली नाही. याचे चटके पर्यटन क्षेत्र सोसत आहे. जवळपास 500 कोटींचे नुकसान झालेले आहे. तसेच 15 मार्चपासून व्याघ्र प्रकल्प बंद आहेत. सप्टेंबर 2021पर्यंत पर्यटक जंगल भ्रमंतीकडे कानाडोळा करतील. परिणामी, व्यवसाय सावरणे कठीण झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी हॉटेलिंग व्यावसायिक तौसिफ़ पठाण यांनी केली आहे.

रोजगार प्रभावित

पुढील आदेशापर्यंत वनपर्यटन बंद करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिले आहेत. पर्यटन बंद असल्याचा फटका वाहतूक व्यवसाय, हॉटेल, गाईड, जिप्सी चालक यांना बसला आहे.

- मंगेश दाढे