पाय खेचण्याची स्पर्धा! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जून २०२०

पाय खेचण्याची स्पर्धा!
स्पर्धा...स्पर्धा...स्पर्धा...च्यायला नाव घेतलं की पोटात दुखायला लागते. कशाकशाची आणि कुणासाठी ही स्पर्धा...हा काळ कोरोनाचा असल्याने तर मनाची आणखी घालमेल होऊन अश्वस्थ करतेय सारं...कोणी आणली ही स्पर्धा? आता बघा काही दिवसांपूर्वी सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. सर्वत्र खळबळ माजली. या घटनेसंदर्भात नवीन-नवीन उलगडे समोर येत आहेत. त्यातील एक म्हणजे सुशांतचे आगामी काळात प्रदर्शित होणारे सहा चित्रपट त्याच्याकडून काढून घेण्यात आले होते, असा दावा केला जातोय. खरं पण असेल. यश, प्रसिद्धी, पैसा पायात लोळत असल्याचे बघून अनेकांचा सुशांतला बघून तीळपापड होत असेल. कारण त्याची बॉलीवूडमध्ये पार्श्वभूमी नव्हती. ज्या क्षमता आहेत त्याचा वापर करून कूच करणे, इतकेच सुशांतच्या हातात होते. दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने बरेच काही मिळविलेही होते. येथे सुशांत फक्त उदाहरण आहे. असे किस्से अनेकांसोबत होत असतात. क्षेत्र कोणतेही असू द्या...हेवे-दावे, रुसवे-फुगवे, ओढ-ताण होतेच. ते नसेल तर व्यक्तिमत्व घडत नाही, असं म्हटलं जातंय. पण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पाय खेचण्याची स्पर्धा योग्य आहे का? मुळीच नाही. मात्र माणसाचा स्वभाव विचित्र आहे. कोणी पुढे गेला की, दुसऱ्याच्या भुवया उंचावतात. त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यात ब्रेक कसा लावता येईल, यामध्ये वेळ घालविन्यात मोठा आनंद मिळतोय.कोणी कार घेतली की पोटात गोळा, कोणी घर घेतलं की, पोटात आग...आणखी काही खरेदी केले की...आणखी काय-काय होते...देव जाणे. असो एकमेकांना खेचण्याच्या गोष्टी अनेक काळापासून सुरु आहेत.याचा इतिहास वेगळा सांगण्याची गरज नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात घेण्याची आहे, ती म्हणजे दुसऱ्यासाठी असे काही केल्यास खरंच आनंद वाढतो काय? कदाचित काही काळासाठी सुख मिळत पण असेल. परंतु, याचे परिणाम वाईट तर असतात. त्याला भोगावेच लागतात. 'पेराल तसेच उगवेल' याप्रमाणे तुम्ही दिलेल्या यातना येथेच भोगाव्या लागतात, ही वस्तुस्थिती आहे.

विनाशाकडे वाटचाल!

ही कोणती स्पर्धा जेथे एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून पुढे जाण्यास मज्जा येते. जो तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. फक्त ऐकवण्याच्या गोष्टीत स्वारस्व मानतो.'आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून' अशी भरकटलेली तसेच वाईट दृष्टीच्या विचारांचा अंगीकार करून त्रुट्या काढण्यात अनेक महाशय धन्यता मानतात. आपल्या खांद्याला खांद्या लावून चालणारा पुढे जाण्यास निघाला की, पाय खेचण्याची ओढच काही जणांना लागते. स्वतःचा विकास सोडून दुसऱ्याचा वाईट विचारांना डोक्यात घर तयार करून देतात. यातून स्वतः पण पुढे जाण्याची गोडी खल्लास होते. सोबतच दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ करून मनस्ताप देण्याची प्रवृत्ती वाढते. यातून स्वतःच्या विनाशाला खतपाणी घातले जाते.

ही असू शकतात कारणे!

मागे खेचण्याच्या प्रवृत्तीचा विचार केल्यास असे लक्षात येते की, स्वतःला काम करण्याची इच्छा नसणे, दुसऱ्यावर अवलंबून असणे, नवीन गोष्टी शिकण्याची गोडी नसणे, वाचन न करणे, प्रयोगशील जीवन न ठेवणे, आळशी होणे...अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्यातून पक्षाप्रमाणे झेप घेणाऱ्याच्या रस्त्यात काटे टाकले जातात. दुसऱ्याला खड्ड्यात टाकण्याच्या नादात स्वतःच त्यामध्ये खोल-खोल जात असल्याचा भास त्याला होतच नाही.

मंगेश दाढे