'दुःख मायाच वाट्याले का?' - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ जून २०२०

'दुःख मायाच वाट्याले का?'
"आता काय सांगू भाऊ, कोणीच वाली नाही राहिला, घरी कवा पोहचीन सांगता येत नाही, मायी पोरगी कशी असण देव जाणे, हे दुःख मायाच वाट्याले का दिलं रे देवा"? हे शब्द आहेत त्या म्हतारीचे...जी लॉकडाऊन काळात नागपूरवरून अकोल्याला पोरासोबत सायकलने जात होती. भयंकर यातना सोसत ती एक-एक पाऊल पुढे-पुढे टाकत होती. ती कशीबशी सायकलवर बसली होती.ती जेमतेम असेल 60 वर्षाच्या घरात. तिच्या खडतर प्रवासाच्या वेदना ती स्वतःसोबतच बोलत असल्याचा भास होत होता.
वेदना कशाचीही असू द्या...ती मनाला घाव करीत असते. मग ती प्रवासाची असो किंवा जीवनात आलेल्या अन्य कटू अनुभवाची. कोरोनाच्या काळात कित्येक मैलचा प्रवास करून घरी पोहचलेल्या नागरिकांना विचारा या वेदनेबद्दल, येणाऱ्या पिढीला इतिहास म्हणून सांगितला जाईल. तशीच ती या वेदनेविषयी पुटपुट करीत होती. तिच्या जीवनाची चाळण झाली होती. अतिशय कष्टदायक आणि मनाला हेलावून टाकणारे दृष्य होते. आम्ही तांदूळ वाटप करण्यासाठी नागपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळी गावात गेलो होतो. तेथे एका झाडाखाली आजी आणि तिचा मुलगा बसला होता. सकाळचे 9 वाजले होते. तेव्हा मला हे चित्र दिसले आणि त्या म्हातारीने मला प्रवासाचे वर्णन केले. प्रवासाच्या वेदनांची वाट मोकळी करून दिली. डोळ्यात स्वप्न घेऊन मोठ्या शहरात दाखल झालेले 'लोक' कोरोनाने अक्षरश: 'डाऊन' केल्याचे बोलके चित्र होते.

फाटकी चप्पल, एका हातात सामानाचा ढीग, काठी आणि दुःख डोळ्यात साठवून माय लेकाचा प्रवास सुरु होता. त्या म्हातारीला विचारले, 'कुठे चालल्या आजी'? 'बस्स, जावं म्हणलं आपल्या गावाले. मी इथं शहरात राहिली तर मले हा कोरोना मारून टाकन. म्हणून निघालो माया पोरासोबत सायकलनी,'अशी म्हणाली म्हतारी. मी पुन्हा विचारलं, 'इतक्या दुरून येत आहे तुम्ही काही अडचण नाही आली का?' 'आता कुणाले सांगते भाऊ, आपलं दुःख आपल्यालेच झेलाचं आहे. सारं बर्बाद होऊन गेलं रे.. माया पोरीची लय आठवण येत आहे. तिले भेटासाठी जात आहो...'

- मंगेश दाढे