आता लुटता येणार जंगल सफारीचा आनंद; ताडोब्यातील बफरमध्ये १ जुलैपासून पर्यटन सुरु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जून २०२०

आता लुटता येणार जंगल सफारीचा आनंद; ताडोब्यातील बफरमध्ये १ जुलैपासून पर्यटन सुरु

The Royal Tiger Resort, Tadoba
चंद्रपूर(खबरबात);
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आता पर्यटनासाठी खुला होणार आहे. येत्या १ जुलैपासून ताडोब्यातील बफर झोनमध्ये पर्यटकांना जंगल भ्रमंती करता येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. पर्यटनासाठी आरक्षण हे ऑफलाइन राहणार आहे.

कोअर झोनमध्ये पर्यटनास बंदी असून केवळ बफर क्षेत्रात हे पर्यटनास मुभा देण्यात आली आहे. बफर क्षेत्रात पर्यटन सुरू करताना प्रत्येक प्रवेशद्वारावरून सहा जिप्सी सोडल्या जातील. त्यात चार बफर व दोन कोअर झोनच्या जिप्सींचा समावेश राहणार आहे. पर्यटनासाठी आरक्षण हे ऑफलाइन राहणार आहे. सबंधित प्रवेशद्वारावर प्रथम येणार त्याला आरक्षण मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 यासोबतच जंगल भ्रमंती करताना पर्यटकांना स्वतःची काळजी घेणे बंधनकारक राहणार आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वतःचा मास्क, सॅनिटायजर वापरावे लागेल. या दोन वस्तू नसल्यास पर्यटकांना जंगल भ्रमंती करता येणार नाही. ताडोब्याच्या बफर क्षेत्रातील देवाडा, अडेगाव, आगरझरी, जुनोना, नवेगाव, रामदेगी, अलिझंझा, कोलारा, मदनापूर, खिरकाळा, पांगडी, झरीपेठ या प्रवेशद्वारापासून पर्यटकांना सफारी करता येईल. प्रत्येक प्रवेशद्वारावर 'डिजिटल थर्मामीटर'द्वारे पर्यटकांची तपासणी केली जाणार असून पर्यटकांना तापाची लक्षणे दिसल्यास त्यांना जंगल भ्रमंतीपासून रोखले जाणार आहे. यासह अन्य अटी व शर्तीवर ताडोब्यातील बफर झोन पर्यटनासाठी सुरू करण्यात आले आहे.