अंधारी व्याघ्र प्रकल्पातील केटी १ वाघाचा गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जून २०२०

अंधारी व्याघ्र प्रकल्पातील केटी १ वाघाचा गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:
चार महिन्यात पाच जणांचे बळी घेणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील केटी१ नावाने ओळखल्या जाणार्‍या वाघाचा सोमवारी सकाळी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात मृत्यू झाला. 

 १० जून रोजी या वाघाला जेरबंद करण्यात आले आणि ११ जून रोजी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात पाठविण्यात आले होते. गोरेवाड्यात आणल्यापासून या वाघाच्या खाण्यावर परिणाम झाला होता. सुरुवातीचे सलग तीन दिवस काहीही न खाता खाल्ल्यावर त्याने खाणे सुरू केले होते. गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे तज्ज्ञ या वाघावर उपचार करीत होते. या वाघाची प्रकृती अत्यंत चांगली होती आणि आजारपणाची कोणतीही लक्षणे त्याच्यामध्ये नव्हती.

सोमवारी सकाळी प्राणी बचाव केंद्राचे कर्मचारी या वाघाच्या पिंजर्‍याजवळ गेले असता हा वाघ मृतावस्थेत आढळला. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी गोरेवाडा येथील रुग्णालयात या वाघाचे शवविच्छेदन केले. गोरेवाडा परिसरात या वाघाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दुखापतीमुळे या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज गोरेवाडा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.