प्रकाशदूतांकडून युद्धपातळीवर वीज दुरुस्तीचे काम:रायगड जिल्ह्यातील 820 गावांचा वीजपुरवठा सुरळीत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० जून २०२०

प्रकाशदूतांकडून युद्धपातळीवर वीज दुरुस्तीचे काम:रायगड जिल्ह्यातील 820 गावांचा वीजपुरवठा सुरळीत


मुंबई/खबरबात:
अतितीव्र निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील 1976 पैकी 820 गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. रायगड पाठोपाठ सर्वाधिक नुकसान झालेल्या वाशी मंडलातील 301 पैकी 288 गावे अथक परिश्रमातून पुन्हा प्रकाशित झाली आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार उर्वरित गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी स्थानिक व जिल्ह्याबाहेरून आलेले महावितरण व कंत्राटदाराचे प्रकाशदूत अहोरात्र काम करीत आहेत.

महावितरणच्या पेण मंडलातील पेण, अलिबाग, रोहा, मुरुड, पाली, माणगाव, टाळ, पोलादपूर, महाड, गोरेगाव, श्रीवर्धन, म्हसळा या भागाला निसर्ग चक्री वादळाचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे या भागातील 6 लाख 35 हजार 288 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. यातील 3 लाख 62 हजार 221 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी स्थानिक व बाहेरून आलेले 209 अभियंते, 1255 टेक्निशियन, एजन्सीचे 1154 कामगार अहोरात्र काम करत आहेत.
 वादळामुळे इएचव्हीचे बंद पडलेले 4 पैकी 3 उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. 33/11 केव्हीचे 32 उपकेंद्र बंद पडले होते. त्यापैकी 27 उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. बाधित झालेल्या 6,773 रोहित्रांपैकी 3096 रोहित्र पूर्ववत करण्यात आली. उच्चदाबाचे 5,507 खांब व लघुदाबाचे 11,089 खांब जमीनदोस्त झाले होते. त्यातील उच्चदाबाचे 702 तर लघुदाब वाहिनीचे 535 खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. वीज खंडित झालेल्या 18 पैकी 23 रुग्णालये, 2,136 पैकी 882 पाणीपुरवठा योजना व 548 पैकी 275 मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.

वाशी मंडलातील पनवेल ग्रामीण, कर्जत, खोपोली व खालापूर या बाधित भागातील वीजपुरवठा खंडित झालेल्या 4 लाख 34 हजार 527 पैकी 4 लाख 31 हजार 187 ग्राहकांची वीज पूर्ववत करण्यात आली आहे. बंद पडलेले सर्वच 14 उपकेंद्र व 276 फीडर पूर्ववत करण्यात आले असून 301 पैकी 288 गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 2,597 पैकी 2,539 रोहित्र सुरू करण्यात आली असून उच्चदाबाचे 192 पैकी 134 खांब व लघुदाबाचे 459 पैकी 132 खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र प्रयत्नांची शिकस्त सुरू आहे.
               रत्नागिरीत पावणेचार लाख ग्राहकांचा
 वीजपुरवठा पूर्ववत
रत्नागिरी जिल्ह्यात वादळामुळे वीज खंडित झालेल्या 4 लाख 21 हजार पैकी 3 लाख 77 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. हर्णे व केळोशी फाटा हे दोन उपकेंद्र वगळता 45 उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
 बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळी या दोन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही स्थानिक व बाहेरून आलेल्या अभियंते, कर्मचारी व कामगारांच्या अथक मेहनतीतून वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत.