विंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०२०

विंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्हविंचुर ता.०८ येथील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील दोन सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
     गेल्या आठवड्यात येथील रहिवासी व मालेगाव येथे पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रिपोर्ट येण्यापूर्वी सदर इसमाचा विंचूर गावातील इतर नागरिकांशी संपर्क आला होता. तपासणी अहवालात पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच वरिष्ठ पातळीवरून शासकीय यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली. संबंधिताच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले, व दोन मजूर यांचे येवला येथील कोविड १९ कक्षात विलगीकरण करण्यात आले. तसेच संबंधिताच्या संपर्कातील ४० जणांना येथील कर्मवीर विद्यालयात व काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. येथील विद्यालयात विलगीकरण करण्यात आलेल्यांपैकी हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ११ जणांना मंगळवारी पिंपळगाव येथे हलविण्यात आले होते.त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीस पाठवून पिंपळगाव येथेच विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.त्या सर्वांचे गुरुवारी अकरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्य़ाने विंचूरकरांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र शुक्रवारी सकाळी येवला येथे त्याच्या कुटुंबांतील त्याची पत्नी वय ३७ व मुलगा वय १९ हे दोन पॉझिटिव्ह आले तर एक मुलगा व दोन मजुर असे ३ रीपोर्ट निगेटिव्ह आल्याने विंचूर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन वर गेली आहे.त्यामुळे काही दिवसापुर्वी १० मे पर्यंत जाहिर केलेल्या कंन्टेनमेंट झोनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


चीन ते विंचूर.. 
कोरोनाचा प्रवास कसा झाला ?
डिसेंबर पासून चीनमध्ये धुमाकूळ घालणा-या कोरोनाचा आजाराचा विंचूर प्रवास धक्कादायकच म्हणावा लागेल. लाँकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून प्रशासनाकडून कठोर कारवाई/उपाययोजना करत विंचूरकरांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लासलगाव जवळ जिल्ह्यातला पहिला रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणेसह काही ग्रामपालिका सदस्यांनी जीवाची पर्वा न करता गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या. दिवसागणिक मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढणाऱ्या मालेगाव शहरात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा संपर्क विंचूरशी झाला अन विंचूर नगरीत य़ा आजाराने प्रवेश केला. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन खबरदारी घेतल्यास गावातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत होतील.