फ़्रंटलाईन कर्मचा-यांना PPE किट व इतर सुविधा त्वरीत मिळाव्यात:डॉ.अंजली साळवे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

फ़्रंटलाईन कर्मचा-यांना PPE किट व इतर सुविधा त्वरीत मिळाव्यात:डॉ.अंजली साळवे यांची मुख्यमंत्र्यांना विनंतीकंत्राटी आरोग्य कर्मचा-यांना नियमित करण्याबाबत डॉ. अंजली साळवे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

नागपूर (खबरबात):
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील आरोग्य विभागात फ़्रंटलाईनवर कार्यरत आरोग्य कर्मचा-यांना वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई किट) व इतरही सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच येथे कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांचे रिक्त पदावर समायोजन करून त्यांना शासन सेवेत नियमित करण्याची विनंती डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. श्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री ना. श्री राजेश टोपे आणि बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

राज्यातील आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे जनतेची सेवा करीत आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी हे कंत्राटी तत्वावर आणि अत्यल्प मानधनावर, कोणतीही इतर शासकीय सुविधा उपलब्ध नसतांना वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान व क्षयरोग निर्मुलन अभियाना अंतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांना सेवा देणारे कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर व इतर फ़्रंट लाईन आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आहेत. या सर्व कंत्राटी कर्मचा-यांसोबतच नियमित कार्यरत कर्मचा-यांनाही वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई किट) व इतरही सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती डॉ. ऍड. साळवे यांनी आपल्या निवेदनात केली आहे..

राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान, अधिकारी व कर्मचारी महासंघाने दि. 9 मे 2020 रोजी दिलेल्या पत्रानुसार कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समायोजन करण्याचे शासनस्तरावर वारंवार आश्वासन मिळूनही या कर्मचा-यांचे अद्यापही समायोजन झालेले नसल्याने त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सबब, 18 मे 2020 पासून ही संघटना सविनय कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याने ‘कोविद-19’ च्या या अनाकलनीय परिस्थितीशी सामना करण्यासाठी या कंत्राटी कर्मचा-यांची साथ आपल्याला बहुमोलाची ठरत आहे आणि यापुढेही ठरणार असल्याने त्यांच्याशी याबाबत रितसर चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढण्याची विनंतीही डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी केली आहे.

याशिवाय, कोरोनाच्या महामारित आरोग्य विभागात विविध कार्यक्रमांतर्गत वर्षानुवर्षे कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावित आहेत. या कंत्राटी कर्मचा-यांना शासनसेवेत कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत त्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागणीचा सहानूभुतीपुर्वक विचार करण्यात येवून त्यांना रिक्त पदावर समायोजन करुन शासनसेवेत कायमस्वरुपी नियुक्ती देण्याची मागणीही डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी केली आहे.

आरोग्य कर्मचा-यांच्या एकूणच कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून अश्या कठिन प्रसंगात आपल्या सेवेची सर्वसामान्यांना नितांत गरज असल्याने आपले आंदोलन तुर्तास पुढे ढकलावे, आपल्या सर्व मागण्या ‘कोविद-19’ ची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर शासनदरबारी मांडता येतील. आरोग्य सेवा व इतरही आकस्मित सेवा देणा-या कोणत्याही विभागातील कुठल्याही संघटनेने या अनाकलनीय व अकस्मित उद्भवलेल्या परिस्थितीत कामबंद आंदोलन करु नये, असे विनंतीवजा आवाहनही डॉ. साळवे यांनी केले आहे.