चंद्रपूर:नालेसफाई मोहीमेची महापौरांनी केली पाहणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

चंद्रपूर:नालेसफाई मोहीमेची महापौरांनी केली पाहणी

चंद्रपूर:
  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या ६ मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर असून इंडस्ट्रीयल प्रभागात बगड खिडकी रेलवे पटरी जवळ असलेल्या मोठ्या नाल्याच्या सफाई कामाची पाहणी मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी नुकतीच केली. मान्सुनपुर्व नालेसफाई कामाला मनपाने वेग दिला असून शहरातील ६ मोठे व १० छोट्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न घेतले जात आहेत. महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते  यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून जुन महिन्यापर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्यात येणार आहेत.

    नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत ३१५ सफाई कर्मचारी व अतिरिक्त ११५ असे एकुण ४३० कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता ५ जेसीबी लावण्यात आल्या असून लवकरच    पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे. 

यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून ३१ मे रोजी शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस मनपा आयुक्त राजेश मोहिते  यांचा आहे. विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करीत आहे. नाले स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात,  मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे  स्वच्छता निरिक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक सांभाळत आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.

   सदर कामाची पाहणी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आज केली. याप्रसंगी  सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, श्री. रवी आसवानी उपस्थित होते.