मनपातर्फे गरजवंतासाठी होणार धान्य किटची व्यवस्था ::शिधापत्रिका नसलेल्यांना करणार कुपनचे वाटप - - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

मनपातर्फे गरजवंतासाठी होणार धान्य किटची व्यवस्था ::शिधापत्रिका नसलेल्यांना करणार कुपनचे वाटप -

चंद्रपूर:
  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे गरजू नागरीकांकरीता लवकरच धान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींकडे शिधापत्रिका नाही अश्या परिवारांची यादी जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पडताळणी करून मनपातर्फे तयार करण्यात येत असून आज दिनांक ४ मे रोजी मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते गरजवंतांना कुपन देऊन कुपन वाटपाची सुरुवात करण्यात आली आहे. 
   मनपाला प्राप्त झालेल्या यादीची जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत आधारकार्ड द्वारे पडताळणी करून लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. सध्या शिधापत्रिका नसणाऱ्या अत्यंत गरजू अश्या जवळपास ९०००  नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. गरजू नागरिकांना यादीतील नावानुसार प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांकडून प्रथम कुपन व त्यानंतर मनपा झोन कार्यालयामार्फत धान्य किट देण्यात येईल. धान्य किट या सध्या उपलब्ध व्हायच्या असून त्या उपलब्ध होताच त्यांचे झोननिहाय वाटप करण्यात येणार आहे.      
   यापूर्वीही लॉकडाऊन मधे अडकलेले रोजंदारीवर काम करणारे मजूर, शिकणारे विद्यार्थी, एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणाऱ्या बेघर नागरिक या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी मनपाने घेऊन त्यांची विविध मार्गाने मदत केली होती. सर्वांसाठी नाश्ता, जेवण, आरोग्य व्यवस्था, लहान मुलांसाठी बेबी फूड अश्या अनेक प्रकारे मनपाने आपले उत्तरदायित्व यापूर्वीही पार पडले आहे.  आता गरजूंसाठी धान्य किटची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे. 
   या प्रसंगी मनपा आयुक्त श्री. राजेश मोहिते, उपमहापौर श्री. राहुल पावडे, गटनेता श्री. वसंत देशमुख, उपायुक्त श्री. विशाल वाघ व नगरसेवक उपस्थित होते.