गुरुवर्य अरुण फडके यांना विनम्र श्रद्धांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मे २०२०

गुरुवर्य अरुण फडके यांना विनम्र श्रद्धांजली

महाराष्ट्रातील ख्यातकीर्त मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ आणि भाषाअभ्यासक परमआदरणीय गुरुवर्य अरुण फडके यांचे कर्करोगाच्या आजाराने १४ मे रोजी नाशिक येथे निधन झाले. त्यांच्यासारखा व्यासंगी अभ्यासक व संशोधक अचानक निघून गेल्याने मराठी भाषेची, साहित्याची, भाषाशास्त्राची, आणि एकूणच मराठी अस्मितेची अपरिमित हानी झाली आहे. 'शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे' हे ब्रीद उराशी बाळगून गेल्या चार दशकांपासून मराठी भाषेवर संशोधन करून 'मराठी शुद्धलेखन', 'मराठी लेखन-कोश', 'शुद्धलेखन ठेवा खिशात', 'मराठी शुद्धलेखन प्रदीप'(संपा.) अशा दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करून शुद्धलेखनासारखा अत्यंत गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्यात सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितला. पुस्तकलेखनाबरोबरच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही त्यांनी मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे अतुलनीय कार्य केले. त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे मराठी भाषेसाठी एक अमूल्य ठेवा आहे. आज मराठी माणसांना शुद्धलेखन शिकण्यासाठी या पुस्तकांशिवाय अन्य पर्याय नाही.
आज मराठी भाषेची वर्तमान स्थिती पाहता महाराष्ट्राला मराठी शुद्धलेखनाची फार गरज आहे. अशा परिस्थितीत अरुण फडके यांच्या जाण्याने मराठी प्राध्यापक, विद्यार्थी,शिक्षक, अभ्यासक अशा अनेकांची अपरिमित हानी झाली आहे.


त्यांच्याविषयी इतक्या तळमळीने लिहिण्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. मराठी शुद्धलेखनाचा अभ्यास करीत असताना त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनीच मला अचूक मार्ग दाखविला. एकदा, दोनदा, तीनदा त्यांची पुस्तके वाचल्यानंतर चौथ्यांदा जणूकाही अरुण फडकेच माझ्याशी बोलत आहेत अशा पद्धतीने ती पुस्तके माझ्याशी बोलू लागली. त्यामुळे शुद्धलेखनाविषयीचा माझा व्यासंग सतत वाढत गेला. मागील काही वर्षांपासून मी त्यांच्याशी मोबाईलवरूनही शुद्धलेखनाच्या संदर्भात चर्चा करीत असायचो.माझा त्यांच्याशी कुठलाही प्रत्यक्ष संबंध अथवा ओळख नसतानासुद्धा ते माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचे. विचारलेल्या प्रश्नांची अगदी सहज उत्तरे देत. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मला कधी कोणाच्या शिफारशींची गरज पडली नाही. तीन महिन्यापूर्वी मी त्यांना 'अपंग' शब्द बरोबर की 'अपांग' शब्द बरोबर याविषयी दीर्घ चर्चा केली. ही चर्चा आमच्यातील अंतिम चर्चा ठरली. काही वर्षांपूर्वी नागपूर येथे श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात त्यांची मराठी शुद्धलेखनावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत त्यांनी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत केवळ एकट्यानेच मराठी शुद्धलेखना विषयीचे सगळे नियम-उपनियम मोठ्या परिश्रमाने समजावून सांगितले.

मुद्रितशोधन करताना कोणकोणत्या चिन्हांचा वापर करावा, वाक्यातील शब्दरचना कशी असावी अशा अनेक बाबतींत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करीत असताना कधीही त्यांनी पांडित्याचा आव आणला नाही. शुद्धलेखनासारखा अत्यंत क्लिष्ट विषय सोप्या सोप्या पद्धतीने समजावून सांगताना मोठ्या तळमळीने ते समजावून सांगत होते. साधा पॅन्ट, साधी टी-शर्ट घातलेला हा अत्यंत सामान्य माणूस शुद्धलेखनाच्या अभ्यासात अत्यंत असामान्य होता. शुद्धलेखन क्षेत्रातील मोरो दामले, मो.रा. वाळंबे, द. न. गोखले, यास्मिन शेख, कृ. पां.कुलकर्णी, दिवाकर मोहिनी,द.भि. कुलकर्णी यांसारख्या विद्वानांच्या मालिकेतील हे अनमोल रत्न काळाच्या पडद्याआड गेले. परंतु त्यांच्या ज्ञानाची अक्षरलेणी मराठी अभ्यासकांना चिरकाल मार्गदर्शन करीत राहील यात शंका नाही.


- डॉ. राष्ट्रपाल मेश्राम,
मराठी विभाग प्रमुख,
समाजकार्य महाविद्यालय, कामठी, जिल्हा नागपूर.