राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्यांसाठी सोमवारपासून एसटी सेवा होणार सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०२०

राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्यांसाठी सोमवारपासून एसटी सेवा होणार सुरू

अत्यावश्यक सेवा के लिए एसटी और बेस्ट ...
 वैद्यकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन
 चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पोहोचणार
 सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी होम कॉरेन्टाइन व्हावे
 नव्याने येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य अहवाल नियमित द्यावा
  एका बसमधून केवळ 22 प्रवाशांना प्रवासाची मुभा
चंद्रपूर/(खबरबात):
 आधी राज्यातील अडकलेल्या नागरिकांना आपआपल्या गावी जाऊ द्यावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत निधीची व्यवस्था करण्यात येईल, या राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून सोमवारपासून विद्यार्थी नागरिक व प्रवाशांच्या मोफत एसटी बसला सुरुवात होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व प्रवाशांना आपापल्या मूळ गावी पोहोचण्यासाठी राज्यशासनाने उद्यापासून मोफत एसटी प्रवास जाहीर केला आहे. हा प्रवास करताना वैद्यकीय निर्देशांचे तंतोतंत पालन करा,असे आवाहन ना.विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

अन्य राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वेची व्यवस्था होत असताना व केंद्र शासन त्यासाठी परवानगी देत असताना राज्यातील अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाऊ देण्यासाठी एसटी सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विविध संस्था व पालकांकडून सातत्याने होत होती. यासंदर्भात ना. विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा केला होता.

परिवहन मंत्रालयाने यासाठी निधीची कमतरता व अन्य कोरोना अनुषंगीक वैद्यकीय धोक्याची कारणे सांगितली होती. या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत देखील त्यांनी अनेक वेळा चर्चा केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला अखेर मान्यता दिली असून उद्यापासून ही परिवहन सेवा सुरू होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा परिवहन मंत्री अनील परब यांनी देखील केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 हजार विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत होते. याशिवाय अनेक कुटुंब सध्या पुण्यामध्ये अडकून पडले आहे. यासंदर्भात सातत्याने कुटुंबाकडून देखील मागणी होत होती. या सर्वांना यामुळे सुविधा झाली असून आपापल्या गावाकडे परतण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचा आनंद असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, हे सर्व प्रवासी रेड झोन मधून ग्रीन झोन कडे येत आहे. त्यामुळे शासनाने ठरवलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला जिल्हा सोडण्याचे व जिल्ह्यात येण्याचे नियम पाळावे लागतील. फक्त एसटी बस साठी जिल्ह्याच्या सीमा परवानगीने उघडल्या जाणार आहे. त्यामुळे परवानगीशिवाय प्रवासही करू नये, त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाची संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच गावी परतल्यानंतर कोणतीही माहिती दडवून न ठेवता आरोग्य यंत्रणेला अवगत करावे. 14 दिवस प्रत्येकाने अनिवार्यपणे होम कॉरेन्टाइन रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

गेल्या चाळीस-बेचाळीस दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य केले असून आता नव्याने येणाऱ्या प्रवाशांनी देखील प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, आरोग्य पथकाला सहकार्य करावे. असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.