नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मे २०२०

नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरु


नागपुर(ख़बरबात):
कोरोना साथ रोगाच्या पार्श्ववभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरु करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.

कोरोना साथ रोगाच्या पार्श्ववभूमीवर याचा फैलाव होऊ नये यासाठी राज्यातील सर्व वीज भरणा केंद्र महावितरणने मार्च-२०२० पासून बंद केले होते. महावितरणच्या वीज भरणा केंद्रावर दररोज वीज ग्राहक मोठया प्रमाणात देयकाची रक्कम भरण्यासाठी गर्दी करतात. यातून संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने सर्व वीज भरणा केंद्र बंद केली होती.

वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरण्यास अडचण होत असल्याची बाब महावितरणकडून जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करून देण्यात आली होती. किमान ग्रामीण भागात वीज ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथील वीज देयक केंद्र सुरु करण्यासाठी महावितरणने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक २१ मे २०२० पासून केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्देशित केलेल्या मानकांचे पालन करून वीज देयक भरणा केंद्र सुरु करण्याची रीतसर परवानगी दिली आहे. यानुसार येथे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वीज ग्राहक आपल्या वीज देयकाची रक्कम भरू शकतील.

महावितरणकडून सध्या छापील देयकाची प्रत वितरित करणे बंद केले आहे. यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर आलेला एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून देयकाची रक्कम भरण्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशाचे पालन करून केंद्र सुरु करावे. वीज देयक भरणा केंद्रावर सोशल डिस्टन्सचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी तसेच स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. अश्या सूचना यावेळी महावितरणकडून दिल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या वीज ग्राहकांनी सुरु असलेल्या वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन थकबाकी असलेल्या देयकाची भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.