महावितरणकडून आता वीजबिल भरण्यासाठी ‘RTGS व NEFT’ची सुविधा उपलब्ध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०२०

महावितरणकडून आता वीजबिल भरण्यासाठी ‘RTGS व NEFT’ची सुविधा उपलब्ध


नागपूर (खबरबात):
घरगुती ग्राहक व को-ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायट्यांसह ग्राहकांना १० हजारांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून ऑनलाईनसोबतच आता ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलांची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईनची सोय असली तरी प्रामुख्याने धनादेशाद्वारे भरण्यात येते. मात्र कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे बँकींग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन महावितरणने १० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

यासोबतच सिंगल किंवा थ्रीफेज घरगुती वीजग्राहकांनाही आता १० हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम या प्रणालीद्वारे भरता येईल. यासोबतच सर्वच प्रकारच्या ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे क्रेडीट कार्ड, नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, गुगल पे, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेट आदींद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा सुरु राहणार आहे.

घरगुती ग्राहक व को-ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायट्यांसह ग्राहकांना १० हजारांपेक्षा अधिक रकमेचा ‘आरटीजीएस व एनईएफटी’द्वारे भरणा करण्यासाठी त्यांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याची माहिती देण्यात येत आहे. संबंधित ग्राहकांना ‘आरटीजीएस व एनईएफटी’ चा अर्ज महावितरणने दिलेल्या व्हर्चूल बँक खात्याची माहिती त्यांच्या बँकेत देऊन या सुविधेचा लाभ घेता येईल. तसेच वीजबिलावर असलेल्या बँकेच्या खाते क्रमांकावरच ग्राहकांना वीजबिल भरावे लागणार आहे.

 ‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंक  
 घरबसल्या वीजबिलांचा ऑनलाईनद्वारे भरणा करण्यासाठी महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंक पाठविण्यात येत आहे. नोंदणीकृत मोबाईलधारक वीजग्राहकांना वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींसह पेमेंट लिंकसुद्धा पाठविण्यात येत आहे. या लिंकद्वारे संबंधीत ग्राहकांना स्वतःचे वीजबिल ऑनलाईनद्वारे थेट भरण्याची सोय आहे. ज्या वीजग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9930399303 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक)अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ करावा. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा ‘महावितरण’ मोबाईल अँपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.