चंद्रपूरकरांनो सावधान:येत्या काही दिवसात शहरात तीव्र उष्णतेची लाट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मे २०२०

चंद्रपूरकरांनो सावधान:येत्या काही दिवसात शहरात तीव्र उष्णतेची लाट


चंद्रपूर महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चंद्रपूर(खबरबात):
वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषतः चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची संभावना आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू टाळण्यासाठी नागरीकांनी उपाययोजना राबवाव्यात. कारण अगोदरच आरोग्य यंत्रणेचा कोरोनाबाबत लढा सुरू असल्याने तसेच आता येणा-या उष्णतेमुळे लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होवून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असल्याने आवश्यक काळजी घेणे गरजेची आहे अशा सूचना भारतीय हवामान खात्याने दिल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने या उष्णतेच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन प्रत्येक नागरीकांनी करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे .

वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर तसेच सृष्टीतील इतर जीवजंतूंवर दुष्परीणाम होतात. उष्णतेशी निगडित आजारपण व मृत्यू टाळता येणे शक्य आहे, तरी दरवर्षी अनेक लोक उष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अधिक जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या आहेत. 'उष्णतेची लाट ' ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याबाबतीत आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे संभाव्य उष्णतेच्या लाटेपासून सर्वांनी स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे-तहान लागली नसेल तरी, थंड (गार) पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी, थंड पेये - ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, कापडाने डोके झाकावे, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांची विशेष काळजी घ्यावी.
हे करा 
1. घरातच रहा अकारण बाहेर पडू नका. रेडिओ ऐका, टीव्ही तसेच वर्तमानपत्र पहा. उष्णतेबाबत व कोविड-१९ बाबत तपशील पहा.खबरदारी घ्या.
2. काही वेळा-वेळाने मुबलक पाणी प्या. तहान लागली नसेल तरीही थोडे थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे. द्रव प्रतिबंधित आहार ज्यामध्ये मुत्राशय, हृदय विकार व लिवर बाबत यांच्यासाठी वर्ज करण्यात आला आहे, त्यांनी जास्त पाणी पिण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. आपले शरीर हायड्रेट राहण्यासाठी, घरगुती तयार केलेली पेय यामध्ये लिंबू पाणी, लस्सी, ताक, तोराणी-तांदुळापासून तयार केलेले पेय किंवा ओआरएस घ्यावे.
4. हलके व हलक्या रंगांचे, ढिले व कॉटनचे कपडे वापरा.
5. बाहेर पडू नका. मात्र जर बाहेर जावेच लागले तर डोके झाका, तोंडाला रूमाल लावा व छत्रीचा वापर करा. कुठेहा इतरत्र स्पर्श करणे टाळा.
6. बाहेर सामाजिक अंतर पाळा. हात वारंवार स्वच्छ धुवा.
7. घरात प्रत्येक व्यक्तीने वेगळे टॉवेल वापरावेत. तसेच ते वरवर स्वच्छ धुवावेत.

उष्माघाताची लक्षणे - अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे ही लक्षणे आढळल्यास थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते), थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा. तसेच १०८ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आकस्मिक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.