जुन्नर पालिकेला मिळाले 3 स्टार कचरामुक्त शहराचे मानांकन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

जुन्नर पालिकेला मिळाले 3 स्टार कचरामुक्त शहराचे मानांकन

जुन्नर /वार्ताहर
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत 3 स्टार कचरामुक्त शहरांच्या यादीत जुन्नर शहराने स्थान प्राप्त करीत आपला झेंडा फडकविला.
राजधानी दिल्ली येथे नगरविकास राज्य मंत्री श्री. हरदीप सिंह पुरी यांनी विविध विभागांतील विजेत्या शहरांची नावे घोषित केली. यामध्ये एकूण 4500 शहरांपैकी 141 शहरांना स्टार मानांकन प्राप्त झाले. त्यापैकी 70 शहरांना 1 स्टार , 65 शहरांना 3 स्टार व 6 शहरांना 5 स्टार मानांकन मिळाले.
कचरामुक्त 3 स्टार शहरासाठी पात्र होण्यासाठी त्या शहराने किमान ODF+ असण्याची अट होती. त्याचप्रमाणे शहराची संपूर्ण वेस्ट प्रोफाईल शासनाने निर्देशित केलेल्या निरनिराळ्या स्तरांवर पात्र होणे आवश्यक होते. या सर्व गोष्टींची पूर्तता जुन्नर नगरपरिषदेने केल्यामुळे व केंद्र शासनाच्या गटाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीच्या अहवालानुसार जुन्नर शहराने हे यश प्राप्त केले. यामध्ये शहराला वेगवेगळ्या 25 प्रकारच्या मापदंडांत अभ्यासले गेले.
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ , 2019 मध्येही जुन्नर शहराने उत्कृष्ठ कामगिरी केली होती व यावेळी आपला नंबर आणायचाच यासाठी नगरपालिकेने तयारी केली होती. आता मिळालेल्या मानांकणामुळे जुन्नर शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये चांगला गुणानुक्रम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निकालाची बातमी समजताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्ष श्री शाम पांडे यांनी हे यश जुन्नरच्या जनतेचे असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे , आरोग्य प्रमुख श्री प्रशांत खत्री यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे हे यश प्राप्त झाल्यामुळे परिसरातून जुन्नर पालिकेचे कौतुक होत आहे.