मक्याचे हमीभाव केंद्र त्वरित सुरू करा -किशोर तरोणे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२०

मक्याचे हमीभाव केंद्र त्वरित सुरू करा -किशोर तरोणे
मका उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवासंजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 25 एप्रिल 2020.
नवेगावबांध:-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली जाते. आजमितीला तालुक्यात 1000 हेक्टरच्या वर मक्याचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मक्याचे पीक शेतकऱ्यांच्या हातात आले आहे. परंतु अजून पर्यंत हमी भावाचे मका खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांची पंचाईत झालेली आहे. आधारभूत मका खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे. अशी मागणी नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य किशोर तरोणे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ व खासदार प्रफुल्ल पटेल यांना एका पत्राद्वारे केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात हजारो हेक्टर जागेवर मक्याचे उत्पादन घेतल्या गेले आहे. रब्बी हंगामातील मक्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. मागील वर्षी राज्य शासनाचा मक्याचा हमीभाव 1760 रुपये एवढा होता. मक्याचा खुल्या बाजारात भाव 2000 रुपये प्रति क्विंटल होता. मात्र यावर्षी आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे तसेच कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे व चिकन वर आलेल्या घोषित मंदीमुळे, कंपन्यांनी खरेदी जवळपास बंद केली आहे. त्यायामुळे मक्‍याच्या दरात एकदम घसरण झाली आहे.बाराशे रुपये प्रति क्विंटल भावाने शेतकरी मका खुल्या बाजारात विकत आहेत. अडलेल्या नडलेल्या शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडून आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासनाचे हमीभाव व खुल्या बाजारातील भाव यात फार मोठी तफावत आहे. बाराशे रुपये प्रतिक्विंटल दराने खुल्या बाजारात व्यापारी शेतकऱ्यांच्या मका विकत घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. ही लूट थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी ,शासनाने मका खरेदीसाठी आधारभूत केंद्र तालुक्यात ठिकठिकाणी ताबडतोब सुरू करावे. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.