वनालगतच्‍या गावांमधील नागरिकांना तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत उपलब्‍ध करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० एप्रिल २०२०

वनालगतच्‍या गावांमधील नागरिकांना तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत उपलब्‍ध करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणीसकारात्‍मक कार्यवाहीचे मुख्‍यमंत्र्यांचे आश्‍वासन


गौतम धोटे आवरपूर :-
चंद्रपूर कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे वनालगतच्‍या गावांमधील नागरिकांना सुध्‍दा अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाच्‍या डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन‍ विकास योजनेच्‍या माध्‍यमातुन या नागरिकांना तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत उपलब्‍ध करून देण्‍यात यावे, अशी मागणी माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी आज मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याशी दूरध्‍वनीद्वारे चर्चा केली. यासंदर्भात त्‍वरीत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन मुख्‍यमंत्र्यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.
यासंदर्भात मुख्‍यमंत्र्यांशी झालेल्‍या चर्चेदरम्‍यान आ. मुनगंटीवार म्‍हणाले, कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्‍याण पॅकेज जाहीर केलेले आहे. या पॅकेज अंतर्गत उज्‍वला योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे व त्‍या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू आहे. मानव वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाच्‍या वनविभागातर्फे डॉ श्‍यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातुन वनालगतच्‍या गावांमधील नागरिकांना एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्‍ध केले जाते. सदर नागरिकांनी उज्‍वला योजनेचा लाभ न घेता महाराष्‍ट्र शासनाच्‍या सदर योजनेला प्राधान्‍य देत शासनाला सहकार्य केले आहे. त्‍यामुळे लॉकडाऊन च्‍या परिस्‍थीतीत सदर वनालगतचया गावांमध्‍ये राहणा-या नागरिकांना राज्‍य शासनाने तीन सिलेंडर्स मोफत उपलब्‍ध करणे गरजेचे आहे. राज्‍य शासनाने त्‍वरीत याबाबत निर्णय घ्‍यावा व वनालगत राहणा-या नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे.