यंदा समाज बांधवांनी घरीच केली महामानवाची जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ एप्रिल २०२०

यंदा समाज बांधवांनी घरीच केली महामानवाची जयंती साजरी

  • संविधानाचे शिल्पकार बाबासाहेबांना नवेगावबांध येथे अभिवादन


  • प्रशिक व पंचशील बुद्ध विहार बाबासाहेबांना वाहिली आदरांजलीसंजीव बडोले/नवेगावबांध.
15 एप्रिल 2020.
नवेगावबांध:-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती प्रशिक बुद्ध विहार व पंचशील बुद्ध विहार इंदिरानगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.समाजबांधवानी घरीच राहून महामानवाला अभिवादन केले. कोरोनाव्हायरस च्या प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत लॉक डाउन व संचारबंदी असल्यामुळे ,यंदा मोठ्या उत्साहात होणारी बाबासाहेबांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र साखरे ,समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे, देवदास बडोले उपस्थित होते. बाबासाहेबांच्या व भगवान बुध्दाच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून, बुद्ध वंदना घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विहारात समाज बांधवांनी गर्दी केली नव्हती. समाजाच्या वतीने भीम जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. समाजबांधवांनी या आव्हानाचे पालन केले, विहारात कोणीही गर्दी केली नाही. त्यामुळे समाज बांधवांनी स्वतःच्या घरी बाबासाहेबांची जयंती साजरी करून सामूहिक बुद्ध वंदना केली. अंगणात सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे काहींनी आपल्या घरावर रोषणाई केली होती. सायंकाळी 7.00 वाजता घरासमोर दिव्यांची आरास मांडून,दीप प्रज्वलित करून कोरोनाव्हायरस च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत अहोरात्र कार्य करणाऱ्या राष्ट्रीय सेवा कर्मि डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी यांचे आभार मानले.काही युवकांनी फटाके फोडून आम्हीही देशातील या कठीण प्रसंगी आता तुमच्या सोबत आहोत, असा संदेश दिला. अत्त दीप भव, बहुजन हिताय बहुजन सुखाय या महाकारूणीक भगवान गौतम बुद्धाच्या संदेशाचे मनन करून दीपोत्सव साजरा केला व सर्व देशबांधवांसाठी मंगल कामना केली.इंदिरानगर येथील पंचशील बुद्धविहारात नंदकिशोर उके, कमल घरडे यांच्या उपस्थितीत, रविशंकर बडोले यांनी ध्वजारोहण केले. उके आणि घरडे यांनी तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व संचार बंदीचे उल्लंघन होऊ नये. यासाठी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बारीक लक्ष ठेवून होते. बाबासाहेबांची जयंती शांततेत पार पडली.

संजीव बडोले, नवेगावबांध.