लॉकडाऊनमुळे चंद्रपूरात अडकून पडलेले निराश्रित आपल्या परिवारसोबत साधणार व्हिडिओ कॉलिंगने संवाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ एप्रिल २०२०

लॉकडाऊनमुळे चंद्रपूरात अडकून पडलेले निराश्रित आपल्या परिवारसोबत साधणार व्हिडिओ कॉलिंगने संवाद

खासदार बाळू धानोरकरांनी घेतली निराश्रितांची भेट
टीव्ही आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा करण्याचे निर्देश
चंद्रपूर : 
खासदार बाळू धानोरकर यांनी (ता. २६) लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या निराश्रितांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समस्या ऐकून घेत त्या निकाली काढण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना दिले. शहरातील तुकुम, जटपुरा गेट आणि दादमहल वॉर्डातील निवारा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. या निवारा केंद्रात गोंदिया, हेंद्राबाद, तेलंगणा, बिहार, राजस्थान, यवतमाळ येथील कामगारांच्या समावेश आहे. 

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शेकडो नागरिक अडकून पडले आहेत. त्या नागरिकांची महानगरपालिकेमार्फ़त निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन-२ ची घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही. मात्र, प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने लॉकडाउनमुळे अडकलेल्या निराश्रितांच्या निवास, भोजनाची व्यवस्था शाळांमध्ये केली आहे. 

खासदार धानोरकर यांनी या केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी निराश्रितांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क करता यावा म्हणून व्हिडिओ कॉलिंगची व्यवस्था करावी, सकाळपाळीत नाश्ता देण्यात यावा, मनोरंजन आणि दिवसभराच्या घडामोडींची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक केंद्रात टीव्ही लावण्यात यावा, असे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांना दिले. यावेळी काँग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय, माजी स्थायी समिती सभापती रामू तिवारी, राजेश अडूर उपस्थित होते.