‘कोरोना’शी लढण्यासाठी नागपुर मनपात ‘वॉर रूम’ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ एप्रिल २०२०

‘कोरोना’शी लढण्यासाठी नागपुर मनपात ‘वॉर रूम’

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना 
 आरोग्य यंत्रणा सशक्त करण्यासाठी उपयोग
नागपूर/प्रतींनिधी:
 नागपुरातील ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, त्याची अंमलबजावणी आणि परिस्थितीवर नियंत्रणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका मुख्यालयात ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून ह्या ‘वॉर रूम’मध्ये रणनीति आखली जात आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या ‘वॉर रूम’मध्ये कोरोनासोबत लढण्याची रणनीति तयार केली जाते. नागपूर महानगर पालिकेकडे कोरोना कंट्रोल रूम, कोव्हिड-१९ मोबाइल ॲप, कंटेनमेंट सर्वेक्षण, हाय रिस्क नागरिकांचे सर्वेक्षण, ४८ रॅपिड रिस्पांस टीम, राज्य शासन आणि केन्द्र शासन आदींच्या माध्यमातूनदररोज ‘कोरोना’संदर्भात माहिती प्राप्त होते.

 मिळालेल्या माहितीवर काय कार्यवाही करायला हवी, काय कार्यवाही झाली आहे यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत दररोज रात्री ९.३० वाजता चर्चा केली जाते. डॉक्टरांच्या चमूसोबत विचारविनिमय करून याच ‘वॉर रूम’मध्ये रणनीति ठरविली जाते. गेल्या आठवडाभरापासून हे काम अविरत सुरू आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, ‘कोरोना’वर प्रतिबंध घालण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘वॉर रूम’ची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. 

मात्र, ही वॉर रूम केवळ कोरोनापुरतीच मर्यादित राहणार नसून ‘कोरोना’चे संकट गेल्यानंतरही भविष्यात मनपाची आरोग्य यंत्रणा अधिक सुदृढ आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने ‘वॉर रूम’ कार्य करेल. ही वॉर रूम नेहमीकरिता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.