विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री


 गडचिरोली : 
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत निर्णय घेऊन वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. या संकटकाळातही अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासीबहूल जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील असल्याने व तेथील कोरोनाची परीस्थिती लक्षात घेता ते या जिल्ह्याकडे लक्ष देवू शकत नसल्याने मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली. ना.विजय वडेट्टीवार हे गडचिरोली जिल्ह्यातील असल्याने लॉकडाउनच्या काळात त्यांनी अनेकवेळा जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता .

गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. हाताला काम नसल्याने स्थानिक नागरिक तेंदूपत्ता, मोह व अन्य कामातून उदरनिर्वाह करतात. टाळेबंदीच्या काळात स्थानिकांची होरपळ होत आहे. स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळत असले तरी रोजगाराअभावी रोजचा खर्च कसा भागवावा? असा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीमुळे आशेचा किरण निर्माण झालाआहे.

दरम्यान राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाच्या संकटकाळात गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, गरजू नागरिकांना १० किलो तांदूळ, २ किलो तूर डाळ, १ किलो खाद्य तेल, 300 ग्राम तिखट, हळद, मीठ, साबण यासह जीवनावश्यक साहित्य असलेले २ हजार किटसचे गरजू, शेतमजूर यांना वाटप केल्या आहेत. वडेट्टीवार यांना गडचिरोली जिल्ह्याबद्दल तळमळ असल्याने त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याची मागणी होत होती.


लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना अन्नधान्यापासून ते रोजगारापर्यंतचा शोध घ्यावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक मजूर परराज्यात व परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. मात्र, त्यांची समस्या ऐकून घेण्यासाठी कोणीही तयार नाही. अशातच नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराच्या घटनाही घडल्या असताना, 

अशा कठीण प्रसंगीच पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष असावे या उद्देशानेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. राज्यातील महाविकास आघाडीने अतिरिक्त गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याने नागरिकांत आशेचे किरण निर्माण झाले आहे.