नागपुरचे ‘कॉटन मार्केट’ तातडीने सुरू करा:महापौर संदीप जोशी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ एप्रिल २०२०

नागपुरचे ‘कॉटन मार्केट’ तातडीने सुरू करा:महापौर संदीप जोशी


महापौरांचे निर्देश:भाजीविक्रेत्यांनी मांडली कैफियत
नागपूर/प्रतींनिधी:
निर्जंतुकीकरणासाठी कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत तीन दिवस बंद करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला मात्र  दोन दिवस उलटूनही मार्केट सुरू करण्यात आले नाही, अशी कैफियत कॉटन मार्केट मर्चंट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना महापौर संदीप जोशी यांच्यासमोर मांडली. याची दखल घेत त्यांनी कॉटन मार्केट तातडीने सुरू करण्याचे करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. 

महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी (ता. २) शहरात विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या भाजी मार्केटला भेट दिली. दरम्यान, ते कॉटन मार्केट येथेही पोहोचले. तेथे कॉटन मार्केट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. निर्जंतुकीकरणाच्या नावावर मनपा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत मार्केट बंद करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही मार्केट बंद ठेवले. मात्र ३१ मार्चनंतरही प्रशासनाने मार्केट सुरू करु दिले नाही. गाड्या अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे गर्दी होते, हे कारण पुढे केले जात आहे. प्रशासनाने कळमना मार्केट बंद केल्यामुळे तेथील संपूर्ण भार कॉटन मार्केटवर आला होता. आता ते मार्केट सुरू केले. 

शहरात इतर दहा ठिकाणी मोकळ्या जागांवर मार्केट सुरू केले. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेले नागपूरच्या मध्यवर्ती भागातील कॉटन मार्केट बंद ठेवले. आम्ही सर्व नियम पाळायला तयार आहोत. सामाजिक अंतर पाळायला तयार आहोत. गाड्यांची संख्या कमी करायला तयार आहोत. मार्केटचे गेट पूर्णपणे उघडे न ठेवता अर्धवट उघडे ठेवून सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवायला तयार आहोत. दिवसभर मार्केट सुरू न ठेवता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत पूर्ण व्यवसाय करायला तयार आहोत. मात्र, प्रशासनाने विश्वासात न घेता, चर्चा न करता घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी मनपाचे उपायुक्त महेश मोरोणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. शहरात इतर ठिकाणी मार्केट सुरू केल्यामुळे गर्दी विभागली गेली आहे. कॉटन मार्केट अटी आणि शर्तींच्या आधारे सुरु करायला हरकत नाही. गाड्यांची संख्या ५० किंवा १०० ठेवा. किंवा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये गाड्या सोडा. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाळावयाचे सर्व नियम पाळण्याची ताकीद देऊन तातडीने कॉटन मार्केट सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.