गरोदर महिलांच्या तपासणीसाठी नागपुर मनपाची विशेष चमू:मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ एप्रिल २०२०

गरोदर महिलांच्या तपासणीसाठी नागपुर मनपाची विशेष चमू:मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना


विशेष रुग्णवाहिकेद्वारे रहिवासी क्षेत्रात जाऊन मनपा देतेय सेवा
नागपूर:
लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी होणे तसेच आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष चमू निर्धारित केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून यासाठी विशेष रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेद्वारे स्त्री रोग तज्ज्ञ गरोदर महिलांच्या रहिवासी क्षेत्रात जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. रविवारी (ता.२६) शहरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा भागामध्ये चमूद्वारे गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील कोरोना संसर्गाचे 'हॉटस्पॉट' प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रतिबंधीत क्षेत्रातील अती धोकादायक गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून या ठिकाणच्या गरोदर महिला शोधून त्यांची आरोग्य तपासणी मनपाद्वारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तपासणीसाठी या महिलांना कोणत्याही रुग्णालयात जायची गरज नाही. त्या राहत असलेल्या ठिकाणी मनपाची चमू येईल व स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या जातील. गरोदर महिलांची रक्त, लघवी तपासणी किंवा लसीकरण आणि आवश्यक औषधोपचार या सर्व सुविधा मनपाद्वारे घरपोच देण्यात येत आहेत. रविवारी (ता.२६) कोरोना संसर्गाचे 'हॉटस्पॉट' ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागात जाऊन येथील गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जन्माला येणा-या बाळाला कोणत्याही धोका राहू नये, आई आणि बाळाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने मनपाद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 
आरोग्य तपासणीसह घेणार 'स्वॅब'
गरोदर महिलांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांचा कोरोना चाचणीसाठी 'स्वॅब'ही घेण्यात येणार आहे. यासाठी महिलांना विलगीकरण कक्षात राहण्याची गरज नाही. 'स्वॅब'चा अहवाल निगेटिव्ह राहिल्यास त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र 'स्वॅब'चा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जातील. 

अत्यंत सुरक्षितरित्या हे 'स्वॅब' घेण्यात येते. रुग्णवाहिकेमध्ये कोरोना 'स्वॅब' घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 'स्वॅब' घेणारे डॉक्टरचे फक्त दोन्ही हात बाहेर येतात व चाचणी केली जाते. संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षितरित्या ही चाचणी केली जात आहे. आई आणि होणा-या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चाचणी होणे आवश्यक आहे. स्वतःला आणि येणा-या बाळाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी शहरातील सर्व ठिकाणच्या महिलांनी तपासणीसाठी पुढे यावे व मनपाच्या आरोग्य चमूला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.