नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर:-
 कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हयात आरोग्य सेवा- सुविधा, उपाययोजना, पाठपुरावा, निधीची तरतूद तसेच बैठकांचे आयोजन करण्यात आल्याने नागपूरात कोविड-19 रूग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तरीही कोविड-19 चे आव्हान फार मोठे आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात 
आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १५ एप्रिल रोजीच्या जिल्हा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. 

कोरोनामुळे दिवसेंदिवस वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचा दृष्टिकोनातून तातडीने पाऊले उचलण्यात यावीत अशा सूचनाही डॉ.नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

वैदयकिय सेवेत जे योध्दा अविरत सेवा देत आहेत त्या वैदयकिय डॉक्टर, नर्स, तसेच संपूर्ण चमुचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले.
कोरोना चाचणीच्या नमुने तपासणीस होणारा विलंब, तपासणी अहवाल प्राप्त न झाल्याने आमदार निवासासोबत इतर ठिकाणी विलगीकरणात असलेल्या लोकांना अनावश्यक थांबावे लागते काय? रॅपिड टेस्ट, मोबाईल लॅब या सारख्या चांचण्या अतिसंवेदनशिल भागात सुरू करण्याच्या दृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात असेही निर्देश देण्यात आलेत.

आमदार निवास, वनामती, लोणारा येथे विलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या समस्या असल्यास त्याचा सकारात्मक विचार करण्यात यावा. कोविड-19 चा प्रार्दुभाव वाढल्यास तरतुद म्हणून काही इमारती, वसतीगृह अधिगृहित करून खोल्या तयार कराव्या लागणार आहेत, त्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करून ठेवावी.

माफसू येथे रियल टाईम पी.सी.आर. मशिन उपलब्ध आहे त्याचा वापर सुरू करणे, नागपूरमध्ये काही खाजगी प्रयोगशाळा या कामी इच्छुक असल्यास त्यांची देखील चाचपणी करावी असे डॉ.राऊत यांनी सांगितले. 

आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टिने मनुष्यबळ कमी पडत असल्यास आरोग्य विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचा-यांची यादी तयार करून त्यांच्या सेवा घेण्याच्या दृष्टिने आराखडा तयार करण्यात यावा. 

कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीसाठी पुरेशा प्लॅस्टिक पिशव्या ठेवा आणि अंतिम संस्कार विषयक एस.ओ.पी. चे तंतोतंत पालन करावे असे डॉ.राऊत म्हणाले.

कोविड-१९ च्या विरूध्द लढा देताना सेवा देणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला 50 लक्ष रुपयांचे विमा सुरक्षा कवच आहे. हे विमा कवच इतरही विभागातील मनुष्यबळाला मिळावे अशी मागणी आहे. तरी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत. 

डॉक्टर, नर्स, वैदयकिय चमू, सफाई कर्मचारी इत्यादी कर्मचाऱ्यांकरिता वैयक्तिक सुरक्षा किट, N-95 मास्क, ग्लोव्हज इत्यादी पुरेसे उपलब्ध राहतील, याबाबत खबरदारी घेण्यासही डॉ.राऊत यांनी सुचवले आहे.

काही खाजगी रूग्णालये व औषधी दुकाने बंद असल्याच्या तक्रारी, जास्त दराने वस्तु विक्री करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ.राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.