चंद्रपूर:सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्यावर 17 व मास्क न वापरणाऱ्यावर 386 नागरिकांवर मनपाची कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ एप्रिल २०२०

चंद्रपूर:सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्यावर 17 व मास्क न वापरणाऱ्यावर 386 नागरिकांवर मनपाची कारवाई

चंद्रपुर/प्रतिनिधी:
मास्क न वापरण्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईत चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी ३८६ लोकांवर कारवाई केली असून ७८,५०० रुपये दंड नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांकडून वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या ३८६ नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या १७ नागरीकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. 

कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडुन स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे आढळून येत असल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरीकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे. चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. 

अशा नागरिकांवर पोलिस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणार्‍यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणार्‍यांना व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
याची अंमलबजावणी २३ तारखेपासून सुरू करण्यात आली. ५ दिवसात ३८६ नागरीकांवर कारवाई करून ७६,६०० रुपयांचा एकूण दंड पथकांनी वसूल केला आहे. झोननिहाय कारवाईदरम्यान झोन क्र.१ अंतर्गत १४० लोकांवर कारवाई करून २७,९००रुपये दंड, झोन क्र. २ अंतर्गत १३१ लोकांवर कारवाई करून २६,२०० रुपये दंड, झोन क्र. ३ अंतर्गत ११५ लोकांवर कारवाई करून २२,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मास्क न घातलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरीकाला ३ मास्कसुद्धा देण्यात येत असून, यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे . 

सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात तीनही झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे , सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे,विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे द्वारेही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे ताईच सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.