चंद्रपुर:पुढील आदेश येईपर्यंत विनापरवाना कोणतेही दुकाने उघडता येणार नाही:जिल्हाधिकारी खेमनार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२०

चंद्रपुर:पुढील आदेश येईपर्यंत विनापरवाना कोणतेही दुकाने उघडता येणार नाही:जिल्हाधिकारी खेमनार


चंद्रपूर/प्रतींनिधी:
 जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तसेच केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्या असल्यामुळे लॉकडाउनमध्ये शिथीलता आली,असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय ज्यांना लिखित परवानगी दिलेली नाही. अशा कोणतेही व्यापारी प्रतिष्ठाने उघडू नये. जिल्ह्यातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.मात्र शहरात अनेक वाहनांना पोलिसांनी अत्यावश्यक किराणा वाटप वाहनाचे पास दिले आणि जे जिल्ह्यातील विविध ठिकाणी खेडेगावात जाऊन तांदूळ विकत आहे. ह्या प्रकारामुळे अनेक लोक प्रशासनावर नाराज आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांसाठी जारी केलेल्या आजच्या व्हिडीओ संदेशमध्ये काही ठिकाणी परस्पर दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिल्या गेलेली नाही. त्यामुळे लिखित परवानगी दिल्या गेलेल्या व्यापारी प्रतिष्ठानाशिवाय अन्य दुकाने उघडण्यात येऊ नये. राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर व जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भात लेखी आदेश दिल्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील असून कोणीही प्रवेश केल्यास 14 दिवस कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही. याकडे लक्ष वेधण्याचे स्पष्ट केले आहे.

गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी आज चंद्रपूर शहरातील तीन प्रभागांमध्ये रंगीत तालीम करण्यात आली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागात देखील मॉक ड्रिल अर्थात रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून अशा लोकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शासनामार्फत निराश्रित, निराधार लोकांना जेवण पुरविल्या जाते. शिवभोजन योजनेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.सोबतच आता केशरी शिधाकार्ड असणाऱ्या जनतेलाही अन्नधान्य पुरविल्या जात आहे. शहरात कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मात्र, तयार अन्न किंवा अन्नधान्याची किट वाटप करण्याचे अधिकार फक्त महानगरपालिकेला शहरात दिले असून अन्य ठिकाणी राज्य शासनाचे कर्मचारी याबाबत काम करीत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने यासाठी गोंधळ घालू नये, शहरात संचारबंदी सुरू असून अशा वेळी संचारबंदीचे नियम तोडल्यास आवश्यक कलमान्वये गुन्हे दाखल केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका व शासनाच्या यासंदर्भातील दूरध्वनीवर माहिती देण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात या काळातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे ही त्यांनी सांगितले. कोरोना आजार संपर्कातून येतो त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अतिशय अनिवार्य आहे. त्यादृष्टीने सण उत्सव साजरे करताना लक्ष ठेवावे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम असून आतापर्यंत जनतेने अतिशय संयमाने सहकार्य केले असून यापुढे देखील अशीच अपेक्षा राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 96 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 88 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 80 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 13 आहे. यापैकी 2 हजार 535 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 478 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 106 आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सूचना देत आहे.दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासन कडक कारवाई करत आहे. या कारवाईमध्ये जिल्ह्यातील 236 प्रकरणात एकूण 13 लाख 5 हजार 770 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 741 वाहने जप्त केली आहेत.

प्रशासनाने जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी 07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे.

 मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.