नागपूर,यवतमाळ,भंडारा जिल्ह्यातून प्रवेशाच्या 61 ठिकाणी नाकाबंदी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ एप्रिल २०२०

नागपूर,यवतमाळ,भंडारा जिल्ह्यातून प्रवेशाच्या 61 ठिकाणी नाकाबंदी


विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर
सक्त कारवाई व 14 दिवस कॉरेन्टाइन करणार
चंद्रपूर /प्रतींनिधी:
 चंद्रपूर जिल्हा लगतच्या नागपूर, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या सीमाभागातील 61 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. परवानगीशिवाय जिल्ह्यामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर सक्त कारवाई करा. 14 दिवस कॉरेन्टाइन अनिवार्य करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

जिल्हावासियांशी आज व्हिडीओ संदेश जारी करताना त्यांनी नाका-बंदीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्हा सध्या कोरोना मुक्त असून महाराष्ट्र व देशातील अन्य ठिकाणचे वाढते आकडे लक्षात घेता कधीही ही एखाद्या रुग्णामुळे जिल्हा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सोबतच नागरिकांनीदेखील आपले कर्तव्य पार पाळावे. 3 मे पर्यंत घराबाहेर पडू नये. रस्त्यावर दुचाकी वाहने घेऊन फिरू नये. तसेच फारच आवश्यकता असेल तर मास्क घालूनच ओळखपत्रासह घरामधील केवळ एका सुदृढ व्यक्तीने बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर कोणत्याच परिस्थितीत पडू देऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान,महानगरातील उष्णतामान वाढायला लागले असून उष्माघाताच्या संदर्भात नागरिकांनी जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका व नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे. महानगरपालिका नगरपालिका यासोबतच ग्रामपंचायत क्षेत्रातही नागरिकांनी मास्क बांधूनच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवावेत. तसेच लहान मुलांच्या नियमित लसीकरणाचे काम कोणत्याच परिस्थितीत थांबता कामा नये, यासंदर्भात नागरिकांना तक्रार करायची असल्यास त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07172-251597 या क्रमांकावर दूरध्वनी करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिन कार्यक्रम साधेपणाने
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश शासन परिपत्रकात दिले आहे.

यामध्ये राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. या ठिकाणी केवळ पालकमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद इतकेच पदाधिकारी,अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. कवायतीचे आयोजन करण्यात येऊ नये.विधिमंडळ मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहन करावे.

जिल्ह्यात 28 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 104 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 96 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 88 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 530 आहे. यापैकी 2 हजार 677 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 30 हजार 853 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 128 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 272 प्रकरणात एकूण 15 लाख 36 हजार 270 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 26 वाहने जप्त केली आहेत.

प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी 07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.