महिला कामगारांच्या संघर्षाची अनोखी कहानी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

महिला कामगारांच्या संघर्षाची अनोखी कहानी

  • महिला दिनी 'जन विकास' च्या महिला कामगारांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसमोर प्रार्थना 
  • राज्यातील महिला कंत्राटी कामगारांना किमान वेतन, नियमित पगार व योग्य वागणूक देण्याची मागणी

लढवय्या महिला कामगारांनी आंदोलन मंडपात साजरे केले दोन महिला दिन
दिनांक 23 जानेवारी 2020 पासून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.पाचशे कामगारांमध्ये महिलांची संख्या चारशेच्या वर आहे. या आंदोलनकर्त्या महिला कामगारांनी आज दि.8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेसमोर प्रार्थना केली."हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे,माणसाने माणसाशी माणसा सम वागणे", हे 'उबुंटू' या मराठी सिनेमातील गाणे म्हणून प्रार्थना करण्यात आली.सामुहीक प्रार्थनेनंतर
आंदोलनकर्त्या महिलांनी एकमेकीला मिठाई खाऊ घातली आणि महिला दिन साजरा केला.
शासकीय विभागात काम करणाऱ्या राज्यातील हजारो महिला कंत्राटी कामगाराना नियमानुसार किमान वेतन,नियमीत पगार व योग्य वागणूक मिळत नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महिलांच्या आंदोलनाने एक वर्षापूर्वी मार्च 2019 मध्ये किमान वेतनाच्या निधीला मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला या महिला कामगारांनी भाग पाडले होते.
महिला कामगारांनी एक वर्षापूर्वी बेमुदत उपोषण केल्यानंतर मागील महिला दिनी 8 मार्च 2019 रोजी शासनाने चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे 500 कामगारांसाठी पगारापोटी निधीमध्ये 4,50,47928 रूपयाची वाढ शासनाने केली व 9,37,19228 रूपये निधी मंजूर केला होता.यामध्ये 400 च्या जवळपास महिला कामगार आहेत.
मात्र ,रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. एस.एस.मोरे यांनी किमान वेतनाच्या दरापेक्षा कमी दराच्या अपात्र निविदेला पात्र ठरविल्याने कामगारांना एक वर्षापासून किमान वेतन मिळाले नाही.
यानंतरही महिला कामगारांनी हार मानली नाही. 23 जानेवारी 2020 रोजी या कामगारांनी पुन्हा आंदोलन सुरू केले .गत 45 दिवसांपासून जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात महिला कामगारानी संघर्ष सुरू केला. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये सुरु केलेले साखळी उपोषण, बेमुदत उपोषण काम बंद आंदोलनाची मालिका या वर्षीही सुरू झाली.किमान वेतन,पाच महिन्याचा पगार,दोषी कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याच्या मागण्यांसाठी या महिला कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले.याची वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. यानंतर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्यांना मागण्या मान्य असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.परंतु मागण्यांची अंमलबजावणी झाल्याखेरीज व अंमलबजावणी केल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली.
कामगारांमध्ये बहुसंख्य महिला या अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय समाजातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती
अतिशय गंभीर आहे.पाच महिन्यापासून पगार थकीत असल्याने सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे. आज महिला दिनी आंदोलन मंडपावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या.या प्रतिमेस समोर रांगोळी काढण्यात आली.जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा,राज्यातील कंत्राटी महिला कामगारांना किमान वेतन,नियमीत पगार व योग्य वागणूक देण्यात यावी असा मजकूर रांगोळीद्वारे या ठिकाणी लिहिण्यात आला. यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली व सर्व महिलांनी एकमेकीना मिठाई वाटप करून महिला दिन साजरा केला.

आंदोलनकर्त्या कामगारांनी एकत्रित येऊन अचानक मिठाई खाऊ घातल्याने महिला पोलीस भाऊक
45 दिवसांपासून सुरू असलेल्या या कामगारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी एक पुरुष व एक महिला पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. आज महिला दिन साजरा करताना कामगारांनी एकत्रित येऊन या महिला पोलीसला मिठाई खाऊ घातली. तेव्हा एरवी कठोरपणे राहणाऱ्या पोलीसाच्या चेहऱ्यावरील हावभाव अचानक बदलले व ही महिला पोलिस सुध्दा भावुक झाली.
या आंदोलनात जन विकास कामगार संघाच्या तारा ठमके,शेवंता भालेराव, ज्योती कांबळे, कविता सागोरे, सपना दुर्गे,रश्मी नगराळे,कल्पना शिंदे,नीलिमा वनकर,निशा हनुमंते,अर्चना लाकडे,सोनाली चड्डूके, गीता मून, रीना नाकाडे रेणू मलिक,सुरेखा मडावी, अनिता वानखेडे,अमृता बोरेवार,अनिता आयटे, माधुरी खोब्रागडे ,सुनिता रामटेके, सुरेखा श्रीवास्कर , मयुरी गांग्रेडीवार ,रोशनी नाहरकर, सीमा वासमवार यांच्यासह अनेक महिला कामगारांनी सहभाग घेतला.