बोहल्यावर चढण्यापूर्वी काळाने घेतले झडप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

बोहल्यावर चढण्यापूर्वी काळाने घेतले झडपTwo-wheeler accident in Mathara forest

गोवरी येथील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची माहिती

राजुरा - लग्न पत्रिका वाटून गावाकडे परत येत असताना संतोष रामकिसन लांडे(२७) व गोवरीकडून राजूराकडे येत असणारा प्रीतम परसुटकर(२५) या दोन युवकांची वाहने आमने-सामने धडकली व या अपघातात दोघांचाही उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दिनांक 20 मार्चला दुपारी चारच्या सुमारास रामपूर - माथरा वळणावर घडली. दोन्ही युवक गोवरी येथील एकाच वार्डात शेजारी राहणारे रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. विशेष म्हणजे संतोष रामकिशन लांडे या युवकाचे लग्न बारा एप्रिल रोजी ठरलेले होते. मात्र बोहल्यावर चढण्यास अगोदरच काळाने दुर्दैवी घाला घातला. त्यामुळे लांडे परिवारावर  दुःखाचे संकट कोसळले.
संतोष लांडे यांचा विवाह सोहळा ठरला असल्यामुळे आपल्या नातेवाइकांना पत्रिका देण्यासाठी तो राजुरा रामपूर येथे आलेला होता. पत्रिका वाटप करून तो अंदाजे चारच्या सुमारास आपल्या दुचाकी वाहनाने गोवरी येथे जाण्यासाठी निघाला. दरम्यान वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू झालेला होता. रामपूर वरून निघाल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर समोरून येणारा प्रीतम परसुडकर याचे वाहन एकमेकांना धडकले. दोन्ही वाहनांची धडक भीषण होती . दोघेही गंभीर जखमी झाल्याने तात्काळ चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघेही गोवरी येथील एकाच वार्डातील राहणारे शेजारी होते. शेजारी वार्डात व अंगणात खेळणाऱ्या दोन तरुण मित्रांचा असा दुर्दैवी मृत्यू होईल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र नियती समोर कोणाचेही काही चालत नाही. संतोष लांडे याला बोहल्यावर चढण्यास पूर्वीच काळाने दुर्दैव झडप घातली. तर प्रीतम परसुटकर हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दोघेही अत्यंत मनमिळावू गावातील तरुण मुले होते. आयुष्याच्या उंबरठ्यावर काळाने झडप घातल्याने लांडे व परसुटकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. घटनेची माहिती गावात कळताच प्रचंड शोककळा पसरली. अनेकांचे अश्रू अनावर झाले. आई-वडिलांचे आधार असणाऱ्या दोन्ही तरुणांवर दुर्दैवी मृत्यू ओढविल्याने गावातील अनेकांच्या चुली पेटल्या नाहीत.