गोदामनगरी वाडीत ट्रकच्या रांगाच रांगा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ मार्च २०२०

गोदामनगरी वाडीत ट्रकच्या रांगाच रांगा

चालकांची जेवणाची व्यवस्था नाही
फळे खाऊन काढतात दिवस
आरोग्य तपासणी नाही
नागपूर: अरूण कराळे:
सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण संख्येत होत असलेली वाढ पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात २१ दिवसाचा कर्फ्यू लावल्याने महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले व गोदाम नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाडी शहरात व ट्रान्सपोर्ट असलेल्या शहरातील अंतर्गत रस्त्यावर ट्रकच्या लांबच-लांब रांगा लागून संचारबंदीचा फटका ट्रक चालकांना बसून ते अडकून पडले आहेत.


वाडी परिसरातील हॉटेल,रेस्टारेंट,नास्ता- पॉईंट आदी संचारबंदी असल्यामुळे बंद आहेत.यामुळे देशातील विविध राज्यातुन व राज्याअंतर्गत विविध लांबच्या शहरातून माल घेऊन आलेले ट्रक गोदाम नगरीत अडकल्याने ड्रायव्हर व कंडक्टरची जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.रस्त्यावर लागलेले मेस वाल्यांचे बोर्डवरून नंबर घेऊन त्यांना फोन करून टिफिन घेत आहे. तर कुठे फळ विकत घेऊन वेळ काढल्या जात आहे.काहींनी सोबत आणलेल्या स्वयंपाकाच्या साहित्याचा वापर करून जेवण तयार करीत आहे.परंतु सोबत आणलेले साहित्य किती दिवस पुरणार,जवळ असलेले पैसे संपल्यावर पुढे काय? घरच्यांशी २१ दिवस भेटता येणार नाही.त्यांचे काय होणार अशा विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहेत.

शहरातील काही भागात ट्रान्सपोर्ट मालकांनी पुढाकार घेऊन जेवणाची ठराविक भागात व्यवस्था केली असली तरी ती पुरेशी नाही.अनेकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.१८ मार्च पासून अडकलेले ट्रकचालक व कंडक्टर जवळ असलेल्या पैशातून खाद्य विकत घेऊन उदरनिर्वाह करीत आहे.

 ट्रक मालक माल खाली केल्याशिवाय येऊ नका अशा सूचना देत आहे,तर दुसरीकडे २१ दिवस संचारबंदी असल्याने कुणालाही कुठे जाता येत नसल्याने अडकलेल्याना जागा सोडता येणार नाही.शहरातील तसेच शहराबाहेरील हॉटेल,ढाबा बंद असल्याने स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आंघोळ किंवा साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शहरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासनाने व आरोग्य विभागाने अडकलेल्या ट्रक चालकयांची आरोग्य तपासणी,तसेच शुद्ध पाणी आणि नाश्त्याची देण्याची व्यवस्था करून यासाठी संपूर्ण ट्रान्सपोर्ट मालकांनी पुढे येऊन आपले आद्यकर्तव्य समजून सहकार्य करण्याची आज अत्यन्त गरज आहे.

सद्यस्थितीत वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक,एमआयडीसी वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात शहरात चोख बंदोबस्त असून सर्वत्र शांतता आहेत.स्थानिक प्रशासनही मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या सूचनांनुसार विविध उपाययोजना करीत आहे.शहरातील खाजगी सर्वच डॉक्टर २४ तास सेवा देत आहे.परंतु निवडणुका येताच मतदारांना मते मागण्यासाठी गल्लोगल्ली अहोरात्र फिरणारे आपल्या वॉर्डात काय स्थिती आहे,मतदारांना कशाची गरज आहे.किंवा दक्षता घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक नेते साधे फिरतांना दिसत नाही.जेणेकरून त्यांना काही सोयरसुतक नसल्याची कृती ही शोकांतिका आहे.