‘Lockdown'sचे काटेकोर पालन करा, अन्यथा….! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ मार्च २०२०

‘Lockdown'sचे काटेकोर पालन करा, अन्यथा….!मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

नागपूर, ता. २९ : नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

त्यांनी रविवारी (ता. २९) पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्‌भवत असलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. ‘लॉकडाऊन’ असताना आणि प्रशासन वारंवार बजावित असतानाही नागरिक खोटे कारणं सांगून विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. बर्डी, कॉटन मार्केट अशा ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे. सध्या नागपुरात कोरोनाचे १४ रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरीत दहा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, नागरिकांनी आता ऐकले नाही आणि प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले आहे. विशेष म्हणजे नागरिक गर्दी करीत असल्यामुळे आजपासून कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठविता शहरातील विविध भागात पाठविण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.