फुकटही कुणी घेईना आणि जनावरेही खाईना : भाजीपाल्यास कवडीमोल भाव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

फुकटही कुणी घेईना आणि जनावरेही खाईना : भाजीपाल्यास कवडीमोल भाव
येवला प्रतिनिधी/विजय खैरनार

येवला: सध्या शेतमालाचे भाव रोजच गडगडत असल्याने भाजीपाला व इतर पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. बाजारात कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कोबी फ्लॉवर टमाटे आदि पिके फुकट वाटत आहे मात्र फुकटही कुणी न घेतल्याने शेतकर्‍यांनी या भाजीपाला पिकात चरण्यासाठी गुरे सोडून संताप व्यक्त केला आहे. जनावरेही हि पिके खाऊन कंटाळले असून त्यांनीही याकडे पाठ फिरवली आहे.शेतकरी वर्ग सदरची भाजीपाला पिके नांगरून टाकत असतांनाचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.
ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला .हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला .तसेच या अवकाळी पावसाने कांदा लागवडी साठी टाकलेले रोपही खराब झाले .त्यानंतर दोन तीन वेळेस रोप टाकूनही वातावरणातील बदलामुळे तसेच दाट धुके ,व दवामुळे हे रोपे खराब झाल्याने तसेच नव्याने कांदा बियाणे उपलब्ध न झाल्याने या भागातील शेतकर्‍यांनी महागडी बियाणे,औषधे ,मजुरी,साठी खर्च करून भाजीपाला पिकांचे उत्पन्न घेतले मात्र या भाजीपाला पिकाला २५ ते २७ पैसे किलो प्रमाणे दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेल्यास शेतकर्‍यांना वाहनाचा खर्चही घरातून करावा लागत असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.

"कांदा रोप खराब झाल्याने तीन महिन्यापूर्वी शेतात कोबी,फ्लॉवर या भाजीपाला पिकाची लागवड केली .पीकही चांगले आले मात्र या भाजीपाला पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने केलेला खर्च वाया गेला आहे त्यामुळे देनेदारांचे देणे कसे फेडायची असा प्रश्न निर्माण झाला आहे".

-सुभाष भालेराव, शेतकरी, पिंपरी.