महीला व पुरुष गटात नागपूर रेंज पोलीस संघ विजयी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मार्च २०२०

महीला व पुरुष गटात नागपूर रेंज पोलीस संघ विजयी


महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा रंगतदार समारोप

उत्तम आदरातिथ्य, नेटके आयोजन, प्रेक्षकांचा जल्लोष


चंद्रपूर दि. २ मार्च - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजीत महापौर चषक कबड्डी सामन्यात महीला व पुरुष या दोन्ही गटात नागपूरचा रेंज पोलीस संघ विजयी झाला आहे.  विदर्भातील १६ महिला व ३२ पुरुष कबड्डी चमूंचा सहभागअसलेल्या या स्पर्धेचे अंतिम सामने रोमांचकारी झाले.  पुरुष गटात अकोला संघ व नागपूर रेंज पोलीस दरम्यान अंतिम सामना तर महिलांचा अंतिम सामना नागपूर सिटी पोलीस आणि नागपूर रेंज पोलीस या संघात झाला. अत्यंत अटी तटीच्या या दोन्ही रंगतदार सामन्यात रेंज पोलीस नागपूर पुरुष व महिला संघ विजेते ठरले. विजेत्या पुरुष संघाला रोख ८१,००० व व चषक तसेच महिला गटात विजेत्या संघाला ५१,००० रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
    देशी खेळांमधे असणारा रोमांच कसा अंगावर काटे उभे करतो याचं अनोखं दर्शन महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम दिवशी पाहायला मिळाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी आयोजित कबड्डी स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडतात. यावेळी २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान कबड्डी स्पर्धा विठ्ठल मंदीर व्यायामशाळेच्या पटांगणात  प्रेक्षकांच्या उत्साहात पार पडली.
    याप्रसंगी वैयक्तिक स्वरूपाचं बक्षिसेही देण्यात आली. वूमन ऑफ द टूर्नामेंट - शाहीन सय्यद रेंज पोलीस नागपूर, वूमन ऑफ द मॅच - कपाली बोरपल्ले सिटी पोलीस नागपूर,उत्कृष्ट चढाई - जितु चौधरी सिटी पोलीस नागपूर,  उत्कृष्ट पकड - पूनम मानकर रेंज पोलीस नागपूर, लोकांची आवडती खेळाडू - दीक्षा भिसे सिटी पोलीस, अष्टपैलू खेळाडू - रोशनी भाजीपाले रेंज पोलीस नागपूर,  उत्कृष्ट खेळाडू - वैष्णवी ढुसे उमरेड , आवडती खेळाडू -  कु. प्रतीक्षा तेलगोटेअकोला.  
     तर पुरुष गटात मॅन ऑफ द टूर्नामेंट - जीवन विघे रेंज पोलीस नागपूर , मॅन ऑफ द मॅच सचिन मालटे  - अकोला, उत्कृष्ट चढाई - कुणाल ठाकूर रेंज पोलीस नागपूर, उत्कृष्ट पकड - महेश वरुडकर, लोकांचा आवडता खेळाडू -आकाश सातरोटे अकोला , अष्टपैलू खेळाडू - शुभम वाघ अकोला, उत्कृष्ट खेळाडू - यश लोखंडे चंद्रपूर, आवडता खेळाडू - प्रज्वल भोयर नागपूर.    
     याप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांनी स्वदेशी खेळासाठी आलेल्या तरुणाईचे अभिनंदन केले. खेळाच्या निमित्ताने आलेल्या खेळाडूंनी महापौर चषकाच्या सामन्यांमधे चुरस निर्माण केली आहे. हीच चुरस स्वदेशी खेळांकडे आजच्या पिढीला आकर्षीत करते आहे ही बाब अभिनंदनीय आहे. मनुष्याचे व्यक्तीमत्व घडविण्याचे काम हे क्रीडा क्षेत्र करीत असते. स्पर्धे निमित्त होणार्‍या खेळामधून मिळणार्‍या स्फूर्तीमुळे व्यक्तीमत्व विकसित होत असते. अत्यंत आनंददायी वातावरणात या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे चांगले आयोजन, खेळाडूंची चांगली व्यवस्था केल्याबद्दल मी महानगरपालिकेचे अभिनंदन  केले.
   जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, उपस्थित मान्यवर,पदाधिकारी , पंच, निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.    
     या प्रसंगी बोलतांना मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार म्हणाल्या की, महापौर चषक सामन्यांचा कबड्डी हा तिसरा टप्पा आहे. कुस्ती बॉडी बिल्डिंग व कबड्डी स्पर्धेला चंद्रपूरकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. स्पर्धा ही सर्वांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. कबड्डी हा मराठी मातीचा खेळ सून या खेळाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळविली आहे. बौद्धिक व शारीरिक विकास करण्यासाठी हा खेळ खूप उपयोगी असून युवकांनी आपल्या संघाच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठावे. खेळाच्या निमित्तानं एकोपा निर्माण होतो, हा एकोपा सांघीक खेळाने निर्माण होतो. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे आभार मानते. त्यांनी आपल्या जीवनात खेळाच्या माध्यमातून यशस्वी व्हावे व आपल्या देशाचे नाव गौरवीत करावे.         
    याप्रसंगी जिल्हा परीषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले,उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे,  माजी अध्यक्ष जिल्हा परीषद श्री. देवराव भोंगळे, गटनेते श्री. वसंत देशमुख, झोन १ सभापती श्री. प्रशांत चौधरी, सौ. नीतू चौधरी जिल्हा परिषद, श्री. दिलीप रामिडवार, महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक - नगरसेविका, अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.