सरकार चुकले, लाॅकडाऊन फसले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२०

सरकार चुकले, लाॅकडाऊन फसले


हातावर पोट असणाऱ्यांनी संचारबंदी झुंगारली. लाँकडाऊन उधळले. सरकारला सनसनित चपराक लावली. सोबत बजावले. आम्हाला गृहित धरू नका. थाळी पिटणाऱ्या पांढरपेशाचा पाठिंबा असेल. जो मीडियाने दाखविला. तो इंडिया होता. तो भारत नव्हे. भारत गेल्या चार दिवसापासून रस्त्यांवर आहे. 

श्रीमंत मीडियाने प्रारंंभी दखल घेतली नाही. जेव्हा लोंढे वाढले. लोक दोनसे-पाचशे किलोमीटर पायी चालताना दिसले. हे लोंढे लाखो-कोटींच्या घरात पोहचले. हे कळल्यावर मीडियावाले धावले. तिसऱ्या दिवशी गर्दी एकत्र आली. तेव्हा दिल्लीतील पत्रकारांनी लाँईव्ह दाखविणे सुरू केले. लोक अनवाणी पायांनी, रक्तबंबाळ अवस्थेत मुलाबाळांसह रस्त्यांवर होती. तेव्हा मोदी सरकारचे मंत्री रामायण बघत घरात बसले होते.

पलायन करणारे कामगार प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थानमधील आहेत. त्यात सर्वाधिक युपीचे आहेत. लाँकडाऊन, क्वारंटाईन, संचारबंदी मोडीत निघाली. तरी कोणती हालचाल नव्हती. कोणी मदतीला गेले नाहीत.

माल वाहतूक गाडीवाल्यांना दया आली. त्यांनी गाडीत बसविले.तर पोलिसांनी त्यांना झोडपले.मदत करणारे सारेच धंदेवाईक नसतात याचेही भान ठेवल्या गेले नाही. या दहशतीने ना कोणी मदतीला जावू शकले, ना वाहन काढू शकले. तो पर्यंत बिचाऱ्यांचे हाल झाले. मदतीचा निर्णय सरकारला घ्यावयाचा होता. प्रत्येक राज्यासाठी केद्रीय मंत्री नेमले आहेत. 

देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी व माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर , रेल्वे मंत्री पियूश गोयल हे महाराष्ट्रातीलच आहेत. एकाकडे रेल्वे, दुसऱ्याकडे परिवहन,तिसऱ्याकडे माहिती . तरी मदतीला कोणी धावले नाहीत.

चीन ,स्पेन, इटली, इराण, जपानमध्ये अडलेल्यांच्या मदतीसाठी विमाने पाठविली. त्यांना मायदेशी आणले म्हणून पाठ थोपाटून घेतली. त्यांच्या कानावर अडलेल्या देशी लोकांची हाक गेली नाही. झोपेचे सोंग करून सारेच बसून राहिले. गडकरी तसे कनवाळू मात्र दुसऱ्या पाळीत त्यांचे तोंड शिवलेले दिसते. नाहीतर आतापर्यंत किमान बोलले असते.

भाजपतर्फे वाटल्या जाणाऱ्या ५ कोटी थालींपैकी एकही थाली रस्त्यांवरील गर्दी पर्यंत पोहचलेली दिसली नाही. चवथ्या दिवशी रात्री सरकारी बसेस मदतीला आल्या. या बातम्या गाववाल्यांना कळल्या. ते द्रवले. ते समोर आले. त्यांनी दिल्ली - युपी मार्गावर ठिकठिकाणी नास्ता, पाणी वाटप सुरू केले. पायी, बसेसने जाणाऱ्यांना थांबवून पाणी, नास्ता देण्यास स्वयंस्फूर्तपणे लोक पुढे आले..

गरिबांना चार दिवस सरकारने वाऱ्यावर सोडले होते. हे बघता हे सरकार गरिबांचे नाही. ते भारतीयांचे नाही. इंडियावाल्यांचे आहे. अन्यथा रस्तोरस्ती गर्दी दिसली नसती. निवडणूका असत्या तर त्या गर्दीत विमाने, हेलिकाप्टर उतरली असती.अन् पाठ थोपाटणाऱ्यांची फौज थाळ्या वाजवत आली असती. सरकार लोकांची अडचण, दु:ख, वेदना बघून निर्णय घेत नाही. फायदा तोटा लक्षात घेवून निर्णय घेते. हे वेदनादायक आहे.

हे लोंढे बघून १९९२ च्या बाबरी विध्वंसाच्या वेळचे लोंढे आठवले. फरक एवढाच होता. ते लोंढे आक्रमक होते. हातात त्रिशूल , काठ्या होत्या. हे लोंढे निशस्त्र आहेत. पाठीवर संसाराचे गाठोडे आहेत.चेहऱ्यावर चिंता आहे. तरी त्यांच्या हिंमतीची व निर्धाराची दाद द्यावी लागेल. दोन-दोन दिवसापासून पोटात अन्न नाही. तरी चालत आहेत. संकटांवर संकट आली.तरी लोंढे थांबण्याचा नाव नाही.

हा गोंधळ बघता एक स्पष्ट झाले. लाँकडाऊन आवश्यक होता. तो लावताना मोदी सरकारने घाई केली. कोणतेही नियोजन नव्हते. देशभर तीन दिवस लाँकडाऊनची एैसीतैसी चालू होती. अद्याप चालू आहे. ते थांबविण्यात सरकार अपयशी ठरली. यातून कोरोना रोखण्याच्या प्रयत्नाना जबर फटका बसण्याची शंका येते.

भूपेंन्द्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार