जि.प. सीईओंनी केली मनपाच्या के.टी. नगर रुग्णालयाची पाहणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मार्च २०२०

जि.प. सीईओंनी केली मनपाच्या के.टी. नगर रुग्णालयाची पाहणीनागपूर, ता. ७: नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी शनिवारी (ता.७) मनपाच्या के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व रूग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी केली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका यावलकर, डॉ.शमा मुजावार, टाटा ट्रस्टचे डॉ.टिकेश बिसेन, अमर नवकर, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते.

टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मनपाच्या के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करण्यात आला. मागील महिन्यातच या आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या या आरोग्य केंद्राला नागपूरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी भेट देउन पाहणी केली.

के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोंदणी कक्ष, डॉक्टर कक्ष, लसीकरण कक्ष, हिरकणी कक्ष, औषध विभाग, प्रयोगशाळा, ड्रेसिंग कक्ष आदींची पाहणी करून सीईओ संजय यादव यांनी माहिती जाणून घेतली. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने विकसीत करण्यात आलेल्या मनपाच्या सर्व रुग्णालयांचा ‘रेकॉड’ ऑनलाईन करण्यात आला आहे. के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही येणा-या प्रत्येक रुग्णाची सर्वप्रथम नोंदणी कक्षामध्ये ऑनलाईन नोंदणी केली जाते. त्यामुळे यानंतर पुढे केव्हाही तो रूग्ण आल्यास त्याचा संपूर्ण आरोग्यासंबंधीचा तपशील संबंधित वैद्यकीय अधिका-यांना माहित होतो. नोंदणी कक्षात नोंदणी झालेल्या रुग्णाचे नाव, त्याचे आजार आदी माहिती उपस्थित वैद्यकीय अधिका-याच्या संगणकावर ऑनालाईनरित्या दिसते. पुढे वैद्यकीय अधिका-यामार्फत करण्यात आलेल्या उपचाराची माहितीही ऑनलाईनरित्या अपडेट केली जाते.त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष असते. विशेष म्हणजे रूग्णालयातील प्रतिक्षालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला असून त्याचे कनेक्शन थेट मनपा मुख्यालयामध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे रूग्णालयावरही आता ऑनलाईनरित्या मनपा आयुक्त व इतर अधिका-यांचा ‘वॉच’ आहे, आदी संपूर्ण माहिती सविस्तररित्या जिल्हा परिषद सीईओ संजय यादव यांना देण्यात आली.

नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी मनपाच्या आरोग्य सुविधेला मिळालेल्या टाटा ट्रस्टच्या सहकार्याचे जि.प. सीईओंनी विशेष कौतुक केले. के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीचा संपूर्ण सविस्तर अहवाल राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी जिल्हा परिषद सीईओ संजय यादव यांनी परिसरात वृक्षारोपन केले.

याप्रसंगी डॉ.राजेश बुरे, डॉ.शिवम शर्मा, निलेश बाभरे, मिनाक्षी गोफने, रुग्णालयातील परिचारिका सुनीता धुर्वे, शिल्पा बोरकर, नलिनी चावटकर, सुमित्रा गोघाटे, छाया शेंबरे, कोमल रोकडे, सौरभ पाचपोर, राहुल मेश्राम, गोकुल हिंगवे, लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.