नागपुरच्या त्या 4 पॉझिटिव्ह रुग्णच्या घरासभोवतालच्या 3 km परिसरातील होणार प्रत्येक घराचा सर्व्हे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

नागपुरच्या त्या 4 पॉझिटिव्ह रुग्णच्या घरासभोवतालच्या 3 km परिसरातील होणार प्रत्येक घराचा सर्व्हे

मनपा डॉक्टरांची चमू करणार घराघरांत सर्व्हेक्षण
नागपूर:
 ‘कोरोना’चा प्रादुर्भाव शहरात वाढू नये यासाठी जिल्हा आणि मनपा प्रशासनातर्फे आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आता नागपुरात जी चार रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आहेत त्यांच्या घरासभोवतालचा किमान तीन कि.मी. परिसरातील प्रत्येक घराचा सर्व्हे होणार असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी मनपाची चमू करणार आहे. 

नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणारी आहेत. ही व्यक्ती परदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचीही माहिती काढली जात आहे. अशांनाही मनपाच्या आरोग्य विभागाने संपर्क केला असून त्यांना होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे. 

मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये घरोघरी सर्व्हे करण्याकरिता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या १६ चमू करण्यात आलेल्या आहेत. एका चमूमध्ये २६ व्यक्ती असून ह्या चमू घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्यांची तपासणी करणार आहे. कुणी परदेशातून आले आहे का, याचीही माहिती या सर्व्हेक्षणादरम्यान मिळणार आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना होम कॉरेंटाईन करण्यात येणार आहे. आवश्यक त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले जाणार आहे. 
नागरिकांनी सहकार्य करावे : मनपा
कोरोनाचा प्रसार होऊ नये. वेळीच त्यावर प्रतिबंध घालता यावा यासाठी हे उपाय करण्यात येत असून आपल्या घरी येणाऱ्या मनपाच्या चमूला सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे मनपाचे अधिकृत ओळखपत्र राहणार असल्याचेही डॉ. प्रवीण गंटावार यांनी सांगितले.