संचारबंदीच्या आदेशाला चंद्रपूरकरांकडून खो:चंद्रपुरकरांचा मुक्त संचार सुरु;पोलिसांच्या डोक्याला ताप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

संचारबंदीच्या आदेशाला चंद्रपूरकरांकडून खो:चंद्रपुरकरांचा मुक्त संचार सुरु;पोलिसांच्या डोक्याला ताप

चंद्रपूर/ललित लांजेवार:
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केलीय. मात्र चंद्रपुरात या संचारबंदीत चंद्रपूर करांचा मुक्त संचार शहरात बघायला मिळाला ,शहरातील जटपुरा गेटवर पोलिसांच्या ब्यारीगेटिंगला न जुमानता चंद्रपूरकर विविध कारण सांगून चंद्रपुरात फिरू लागल्याचे चित्र दिसू लागले. 

भारतातल्या फौजदारी दंडसंहितेतील कलम 144 हे जमावबंदी आणि संचारबंदी ,कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे कलम लागू केलं जातं. या कलमाच्या वेगवेगळ्या तरतुदींनुसार सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध येतात. अश्या परिस्थितीत कुणालाही पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही, तर जमावबंदी म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा अधिक लोकांना एकत्रितरीत्या बाहेर फिरता येत नाही."मात्र मंगळवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटवर मुख्यमंत्र्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आणि संचारबंदीला चंद्रपूरकरांकडून खो मिळाल्याचे दिसून आले.

 या ठिकाणी तैनात असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना शहरातून वाहनांची संख्या वाढत दिसतांच गेटच्या समोर ब्यारीगेटिंग सुरु केली. व अनेकांना वापस पाठवले मात्र शहरातून अनेक छोट्यामोठ्या गल्ल्यातून चंद्रपूरकरांनी मार्ग शोधला आणि निसटू लागले. 

अत्यावश्‍यक सेवांना या संचार बंदीतून वगळण्यात आले असून सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थाळांवर बंदी घालण्यात आली असून केवळ पुजारी अथवा धर्मगुरूंना धार्मिक विधीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. या निर्णायक टप्प्यांवर आपण साथ दिली तर कोरोनाला आपण पराभूत करू शकू, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले. 

संचारबंदीच्या काळात जीवनावश्‍यक वस्तू , औषधे, दुध या दोन्हीचे उत्पादक, त्यासंदर्भातील वाहतूक, बेकरी, पशुखाद्याची दुकाने, शेतीविषयक व्यवसाय यांना वगळण्यात आले आहे.

यावेळी कोणतीच खबरदारी नागरिकांकडून घेतली जात नाहीत. मास्क, रुमाल, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर अशा कोणत्याच खबरदारी नागरिक घेताना दिसत नाही. त्यामुळे चंद्रपुरकरांना गांभीर्य आहे की नाही?कि स्वतःच मरणाला आमंत्रण देत आहेत? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यामुळे कुणी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर जरी पडलं तरी त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते आणि शिक्षाही होऊ शकते.मात्र मोकाट चंद्रपूरकरांवर चंद्रपूर जिल्हाप्रशासन काय कारवाई करणार,फौजफाटा वाढविणार कि विकारानं रस्त्यावरून फिरणाऱ्यांना प्रसाद देणार?हेच बघणे संचारबंदीत औचित्याचे ठरणार आहे. 
आंतर जिल्हा प्रवासबंदी लागू
राज्यात काही जिल्ह्यात अद्याप कोरोनाची बाधा झाली नाही. त्यांना संपर्कहीन अवस्थेत ठेवावे लागेल. त्याचबरोबर जेथे बाधीत असतील तेथेच  विषाणूला गाडावे लागेल. त्यामुळे आंतर जिल्हा सीमा सील करण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र त्यातून जीवनावश्‍यक सेवांना वगळण्यात आले आहेत. खासगी वाहने, बसेस आणि अन्य वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट येथील चेक पोस्ट नाका रात्रो बारा वाजताच सील करण्यात आला. त्यामुळे सकाळपासूनच वाहतूक ठप्प होती. शहरातील सर्व दुकाने बंद होती. प्रत्येक वार्डात शुकशुकाट होता. सुट्टीचा दिवस असून सुद्धा कुणीही नागरिक किंवा मुले रस्त्यावर निघाली नाहीत. सकाळी सात वाजता पासून संपूर्ण शहर निर्जन झाले होते. पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा कार्यरत होती.
मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्णय
1 राज्यात संचारबंदी लागू

2 सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद

3 खासगी वाहनांना बंदी

4 राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं बंद

5 अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार

6 जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार

7 शेतीपयोगी वस्तूंची दुकानं सुरू राहणार

8 कुणीही घराबाहेर पडू नये

9 घराबाहेर पडल्यास नाईलाजाने कारवाई करावी लागेल

10 लोकांना सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना पाळाव्यात