कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मार्च २०२०

कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी  
प्रशासनास सहकार्य करावे:पालकमंत्री विजय वडेट्टीवार
पालकमंत्री यांच्याकडून मोफत मास्कचे वाटप 
चंद्रपूर:
 कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी चंद्रपूरकरसह जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरकरांना केले.
'कोरोना’ व्हायरसच्या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी राज्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याकरिता ब्रम्हपुरी क्षेत्रात माझ्याकडून मोफत मास्कचे वाटप कार्यकार्यकडून करण्यात येत आहे. जनतेशी संपर्कात येणाऱ्या पोलीस, सरकारी दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी, छोटे व्यावसायिक, रिक्षा चालक यांच्यासह आवश्यक नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात येत असून शासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, शहरात अनावश्यक गर्दी करू नये असेही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

घाबरू नका, काळजी घ्या, सतर्क राहा अशी विनंती करताना पालकमंत्री म्हणाले, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 52 पर्यंत पोहोचली आहे.या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा आरोग्य खाते प्रयत्नशील आहेत.कोरोनापासून खबरदारी म्हणून जनतेला अनेक माध्यमांद्वारे वेळोवेळी आवाहने केली जात आहेत.याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. कोरोना व्हायरसचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्या.सोशल मिडीयाच्या माध्यमातून सतर्कता बाळगण्याची विनंती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली..

आतापर्यंत कोरोनावर कोणत्याही प्रकारचं औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही. या आजारापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंट ठेवणे व समाजात मिसळण्यापासून स्वत:ला वाचवणे हा एकमेव उपाय आहे. आतापर्यंत या आजाराने भारतात रौद्र स्वरुप धारण केलेलं नाही. पण या टप्प्यावर सावधगिरी बाळगली तरच हा आजार नियंत्रणात राहू शकतो असे पालकमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रविवारी 22 मार्चला स्वत:हून सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत घराबाहेर न पडता जिल्ह्यातील जनतेंनी कर्फ्यूचे पालन करा असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी 
निधी कमी पडू देणार नाही – विजय वडेट्टीवार
चंद्रपूर
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.


आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले की , (कोविड- 19) विषाणूच्या राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची चर्चा केली. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी नुकताच वितरित करण्यात आलेला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

विभागवार माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी 15 कोटी, पुणे विभागासाठी 10 कोटी, नागपूर विभागासाठी 5 कोटी, अमरावती विभागासाठी 5 कोटी, औरंगाबाद विभागासाठी 5 कोटी, नाशिक विभागासाठी 5 याप्रमाणे एकूण 45 कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. 

या निधीमधून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी,छाननीसाठी सहाय्य, कॉन्टॅक्ट ट्रसींग शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सर्वांनीच एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे, कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी मंत्रालय आणि शासकीय कार्यालय, बसेस, एसटी बसेस, ओला , उबेर या शासकीय आणि खाजगी परिवहनाचे निर्जंतुकीकरण करने, टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे, प्रयोगशाळांची संख्या वाढवणे या अनुषंगाने कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (सी.एस.आर) व इतर माध्यमातून मदत करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. 

राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत राज्यातील जनतेने काळजी घ्या सतर्क राहा असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.