वाडीत खाजगी आरोग्य सेवा बंद:सर्दी,खोकला,तापाच्या रुग्णांनी जावे तरी कुठे? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२०

वाडीत खाजगी आरोग्य सेवा बंद:सर्दी,खोकला,तापाच्या रुग्णांनी जावे तरी कुठे?

विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांचे निवेदन 
नागपूर : अरूण कराळे: 
वाडी नगर परिषद परिसरात कोरोनाचा पार्दुभाव थांबविण्यासाठी नागरिक नगर परिषद प्रशासन व शासनाच्या निर्देशांचे पालन करीत आहे.केवळ अत्यावश्यक सेवा किराणा दुकाने ,पेट्रोल पंप औषध दुकाने फळ ,बेकरी, चक्की आधी सुविधा जनहितार्थ नागरिकांसाठी सुरु ठेवण्याचे निर्देश असल्याने ते सुरू आहेत .

विशेष करून अत्यावश्यक सेवेत मेडिकल स्टोअर्स , खासगी रुग्णालय दवाखाना सुरू ठेवणे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतांनाही वाडी ,दत्तवाडी तील अनेक खासगी दवाखाने बंद ठेवून नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवण्याची गंभीर बाब पुढे आल्याने युवक काँग्रेसचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष अश्विन बैस यांनी वाडी नगर परिषदच्या मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्याकडे सोमवार २९ मार्च रोजी निवेदन दिले आहे . 

अश्विन बैस यांच्या तक्रारीनुसार आधीच वाडी नगर परिषद क्षेत्रात नागरिकांसाठी शासकीय रुग्णालयात उपचार सुविधा नसल्याने नागरिक चिंतेत व आक्रोशीत आहे.ही सुविधा नसल्याने सर्व रुग्णांना खासगी डॉक्‍टर व रुग्णालयात जाऊन महागडे उपचार सुविधा घेणे मजबुरीचे झाले आहे. नगरपरिषद स्थापनेला पाच वर्षे लोटल्यानंतरही वाडीत शासकीय दवाखाना निर्माण करू शकले नाही.

ही एक शोकांतीका आहे . याचे नुकसान आता सामान्य नागरिकांसह मध्यम व मजूर वर्गाला सहन करावे लागत आहे .कोरोना विषाणूच्या भितीने सर्वजन घरात बसले आहे. आरोग्याची मुख्य समस्या दूर होण्यासाठी शासनाने सर्व खाजगी रूग्णालये व दवाखान्यांना बंद दरम्यान पूर्वीप्रमाणे नियमीत सेवा देण्याचा अनुरोध व निर्देश जारी केला आहे .अन्यथा त्यांचे लायसन्स व मान्यता रद्द करण्याची चेतावनी प्रसार माध्यमातून दिली आहे. 

परंतू असे असतांनाही या संकटाच्या समयी काही खाजगी डॉक्टर व चिकीत्सक केंद्र आपल्या मुळ कर्त्यव्याला विसरून नागरीकांना उपचार सुविधा देण्याच्या जागी आपली सेवा बंद करुन घरी बसलेले आहे. रुग्ण जेव्हा त्यांच्या नियोजित वेळेनुसार दवाखान्यात जात आहे तेव्हा दवाखान्याला कुलूप लावलेले दिसून येत आहे ही गंभीर बाब असून शासन आदेशाची अवहेलना होत असल्याचे दिसून येते .

आधीच कोरोनाची भीती नागरिकात पसरली आहे. अशाच सामान्य खोकला ,ताप यांचा योग्य उपचार मार्गदर्शन चिकीत्सक द्वारा झाला नाही तर किती विपरीत परिणाम होऊ शकतो याची गंभीरता खासगी डॉक्टरांनी लक्षात ठेवून पूर्वीप्रमाणे आपली सेवा सुरू करण्याचा अनुरोध युवक काँग्रेसच्या वतीने केला आहे . 

या राष्ट्रव्यापी संकटात मदत करण्याचे सोडून रुग्णसेवा स्थगित करणाऱ्या असंवेदनशील व नियम भंग करणारे डॉक्टर्स दवाखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल व प्रतिसाद न देणारा डॉक्टरांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल.

जुम्मा प्यारेवारे मुख्याधिकारी न. प. वाडी