आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावा अर्ज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मार्च २०२०

आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावा अर्ज


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाचे आवाहन
चंद्रपूर  - 
 राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती  हाताळण्यासाठी नियमित आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते. यादृष्टीने सेवानिवृत्त झालेले मात्र अजूनही सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

   समाजसेवेसाठी इच्छुक शासकीय/ महानगरपालिका / आर्म फोर्सेस ( मेडीकल कॉर्प ) मधून सेवानिवृत्त झालेले परंतु आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मनपाच्या rch.chandrapur@yahoo.com  या ई मेल आयडीवर वर ऑनलाईन अर्ज करावा. विषयात कश्यासाठी अर्ज केला आहे हे स्पष्ट नमूद करावे.  

  करोना विषाणूचा ( कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका  मनपाचा आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यास २४ तास कार्यरत आहे. मात्र भविष्यात याची वाढती व्याप्ती लक्षात घेता अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मनपातर्फे सदर आवाहन करण्यात येत आहे.      
    सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना विषयक शंका समाधानासाठी शासनाद्वारे  टोल फ्री क्रमांक १०४  उपलब्ध करून दिलेला आहे तसेच राज्यस्तरीय कोरोना नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२० - २६१२७३९४ यावर तसेच मनपाचे हेल्पलाईन क्रमांक 07172 - 254614 यावर संपर्क साधता येईल.